कोणत्याही सरकारला आपली यशस्वी प्रतिमा जनमानसात उभी करावयाची, तर त्यासाठी निश्चित कार्यक्रमाची, विचाराची चौकट बनवावी लागते. आर्थिक उद्दिष्टांची अशी जाणीव आज जनता सरकारच्या बोलण्यात, वागण्यात आढळत नाही. जनता पक्षाला मी 'नॉन-पार्टी' म्हणून संबोधतो, याचे कारण या पक्षात निरनिराळे पक्ष सामील झाले. पण ते एकजीव झालेलेच नाहीत. प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे बोलतोय्, वागतोय्, हे पक्ष जनता पक्षातून फुटणार, असेही लोक बोलतात; परंतु वस्तुतः जनता पक्षातील विविध पक्ष फुटण्याचा प्रश्न आहेच कुठे? एकतर ते एकजीव झालेच नाहीत, मुळात ते फुटलेले होते. आजही तसेच आहेत.
यावर काँग्रेस पक्षात दुफळी नाही काय, असा कोणी सवाल करतील, काँग्रेससारख्या जुन्या व मोठ्या पक्षाला दुफळीचा, मतभेदाचा प्रश्न नेहमीच भेडसावीत असतो. परंतु गेल्या नव्वद वर्षांचा हा पक्षाचा इतिहास पाहिला, तर अशा प्रसंगोपात्त निर्माण होऊ पाहणा-या दुफळ्या पचवून, कार्यक्रमाच्या बांधीवपणाने आणि जनतेच्या पाठिंब्याने पक्षाचे सातत्य कायम राहिले आहे. हा इतिहास आहे.
असे असले, तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांना चिंता करावी लागेल, ती मतभेदाचा परिणाम पक्षाने स्वीकारलेल्या कार्यक्रमावर होणार नाही, याची. आर्थिक विषमता दूर करण्याचा, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा किंवा राजकीयदृष्ट्या निवडणुकीचा कार्यक्रम असो, अंतःस्थ मतभेदाचा यत्किंचितही परिणाम या कोणत्याही गोष्टीवर होणार नाही, याची काळजी पक्ष -कार्यकर्त्यांनी घेतलीच पाहिजे. महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना तर अधिकच जागरूक राहावे लागेल, नजीकच्या काळातच आता काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रातील निवडणुकीला सामोरे जावे लागेल. त्या वेळी तर कार्यकर्त्यांनी अन्य कशाचाही विचार न करता सर्वांनी एकजुटीने आपापली सारी शक्ती काँग्रेसच्या पाठीशीच उभी केली पाहिजे.
कार्यकर्त्यांना मी जेव्हा असे आवाहन करतो आणि जनता पक्षाच्या उणिवा सांगतो, त्या वेळी शहाणीसुरती, विचारवंत मंडळीही माझ्यावर जातीयवादाचा आरोप करण्यासाठी चढाओढ लावतात. जाणती माणसे असे काही बोलतात, तेव्हा मला खेद होतो. वाईट वाटते. खूप कष्टी होतो. राजकारणातल्या वादात विचारावर टीका करण्याचे जमत नाही, म्हणून जातीयवादांची शिवी करण्याचा या मंडळीचा प्रयत्न असावा काय ? मला तरी तसेच वाटते.
माझा नम्र दावा असा आहे की, महाराष्ट्रात, राजकारण हे जातीयवादापासून अलिप्त राहावे, यासाठी मी मनस्वी कष्ट घेतले आहेत. महाराष्ट्रात असताना तेथील माझ्या कर्तेपणाच्या दिवसांत आणि नंतरही मी त्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले. मनातून स्वतः मी कधी जातीयवादी भावनेला बळी पडलो नाही. समाजात एकजिनसीपणा आणण्याचेच ध्येय मी निरंतर बाळगले.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे सरकार करावयाचे, हे अखेरीस जनतेच्या स्वाधीन आहे. काँग्रेसचे सरकार यावे, यासाठी अर्थातच मी शर्थीचे प्रयत्न करीन. परंतु याचा अर्थ महाराष्ट्र समाज फुटावा किंवा तेथे जातीयवादाने डोके वर काढावे, असा नव्हे. राजकारण करण्यासाठी म्हणून जातीयवाद या विचारापासून मी नेहमीच अलिप्त राहिलो आहे. माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणारांना मला असं विचारायचंय्, की माझे कोणते विधान जातीयवादाला आवाहन देणारे आहे? जनता पक्षावर टीका करताना जनसंघावर आणि रा. स्व. संघावर मी जरूर टीका करतो आणि यापुढेही करीन. परंतु मी ही टीका करतो, त्या वेळी माझ्यासमोर एक विशिष्ट वर्ग असतो, अशी शहाण्यासुरत्या पुढा-यांची टीका ऐकतो, तेव्हा निराशा वाटते. जनसंघावर आणि रा. स्व. संघावर टीका करताना मी काय एकटाच आहे? टीकाकारांना अभिप्रेत असणार्या वर्गात संघ-जनसंघाचे टीकाकार नाहीत, असे त्यांना म्हणावयाचे आहे काय?