लोकशाही ख-या अर्थाने शक्तिशाली करावयाची, तर लष्करबंद, झापडबंद कार्यकर्त्यांच्या टोळ्या बनवून चालणार नाही 'केडर-पार्टी' ही झापडबंद होण्याची शक्यता असते. विचार करण्याचे यंत्र बंद करून, कान व हात मोकळे ठेवावयाचे आणि फक्त 'आज्ञा' पाळावयाच्या, आज्ञा अमलात आणीत राहावयाचे, एवढेच 'केडर-पार्टी' करू शकते.
काँग्रेस पक्ष अशा स्वरूपाचा असावा काय? माझे उत्तर असे, की एका विचाराने बांधलेले कार्यकर्ते पक्षाच्या संग्रही असलेच पाहिजेत. परंतु एका विचाराने म्हणजे काय? तो विचार कोणता? माझ्या मते, तो विचार हाच असला पाहिजे की, सामाजिक, आर्थिक नव्या उभारणीचे जे काम करावयाचे आहे, त्यामध्ये सामाजिक, आर्थिक न्यायावर अव्यभिचारी निष्ठा आणि दारिद्र्याविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध पोटतिडीक हे दोन महत्त्वाचे गुण ज्या कार्यकर्त्याच्या ठिकाणी आहेत, तो पहिल्या प्रतीचा कार्यकर्ता होऊ शकेल. विचाराच्या या दोन बाजू पक्क्या व्हाव्यात, यासाठी जरूर 'केडर' निर्माण करावे. त्यासाठी कार्यकर्त्यांना आवश्यक ते शिक्षण द्यावे. पूर्वीच्या काळात या विचाराने बांधलेले कार्यकर्ते तयार करण्याची, प्रशिक्षित कार्यकर्ते घडविण्याची प्रक्रिया अवलंबिली जात असे.
परंतु भारतासमोरील प्रश्नांचे स्वरूप आता वेगाने बदलत आहे. १९६० मध्ये तयार झालेला कार्यकर्ता १९७० मध्ये, १९७७ मध्ये निकामी ठरेल, की काय, अशी ही स्थिती. सारेच झपाट्याने बदलत आहे. सार्वजनिक कामाची सुरूवात मी केली, ती त्या काळात कार्यकर्त्यांची बांधणी करण्याचा मनस्वी छंद होता, म्हणून ते काम केले. स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेच्या राजकारणात आल्यानंतर, सत्तेच्या मदतीने कार्यकर्त्यांच्या फळ्या निर्माण केल्याचा आरोप माझ्याविरुद्ध करण्यासाठी जे सरसावतात, त्यांना याची जाणीव नसावी की, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणूनच मी सत्तेत वावरतो, वागलो आणि कार्यकर्त्यांची बांधणी करण्याचे प्रारंभापासून स्वीकारलेले कामच करीत राहिलो. महाराष्ट्रात अगदी प्रारंभी, मी स्वतः सत्तेत नसताना आणि नंतर सत्तेत असताना, कार्यकर्त्यांच्या बांधणीच्या कामाचा ध्यास मी नित्य ठेवला आहे.
महाराष्ट्रासंबंधी लोक मला विचारतात, त्या वेळी मी त्यांना हेच सांगत आलो आहे की, महाराष्ट्र काँग्रेसची शक्ती ही तेथील असंख्य कार्यकर्त्यांची शक्ती आहे. हे कार्यकर्ते चळवळीत वाढले. शेकडो गावांतून ते विखुरले आहेत. काँग्रेसबरोबर ते सातत्याने उभे राहिले आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने सरकारमार्फत व इतरही क्षेत्रांत, पुढाकार घेऊन नागरी व ग्रामीण जीवनांत नवीन आशा, उत्साह निर्माण केला. समाजातल्या सर्व वर्गांतले, जाती-जमातींचे, सर्व धर्मांतील लोक त्यात आहेत. शेतकरी आहेत, कामगार आहेत, मध्यमवर्गीय आहेत. खेड्यांतील आहेत आणि शहरांतले आहेत. सदा सर्वकाळ जागरूक न राहिल्याने कामात काही अपुरेपणा निर्माण झाला असेलही, परंतु या सर्वांतून निर्माण झालेली शक्ती ही महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संमीलित झाली आहे. ही शक्ती आणखी वाढवावी लागणार आहे. त्याची गरज आहे.