राष्ट्रीय चळवळीचा प्रभाव
१९३३ नंतर म. गांधी यांच्या चळवळीचा त्यांच्यावर फार परिणाम वाढत गेला व या काळापासून त्यानी जो राष्ट्रीय झेंडा खांद्यावर घेतला, आमरण वाहिला. तुरूंगवास भोगिले. भूमिगत चळवळीतील ते एक सुशिक्षित सूत्रधार होते.
सन १९४७ सालात स्वातंत्र्य आले. पुढे भारताने त्याची स्वतंत्र घटना केली. यशवंतरावांचे निम्मे आयुष्य पारतंत्र्यात गेले व पुढील निम्मे स्वतंत्र झालेल्या गेले. दोन्ही परिस्थितींचा त्यांना अनुभव मिळाला. म. फुले शाहूमहाराज यांच्या संबंधीच्या प्रेमाने त्यांचे हृदय व्यापिलेले होते. म. गांधी नेहरू ही तर त्यांची दैवत होती. एकूण समाज उत्तरोत्तर एकरस बनत आहे याचे श्रेय महर्षि शिंदे व त्यांच्यानंतरचे राष्ट्रीय पुढारी यशवंतराव यांजकडे जाते. दोघांचीही दृष्टी विधायक, रचनात्मक व देशभक्ती पारायण होती.
यशवंतराव व दलितोद्धार
डॉ. आंबेडकरांनी महार वतन बिल मुंबई कौन्सिलात आणिले होते. पण ते त्याकाळात पास का होऊ शकले नाही याची स्वच्छ मीमांसा भारतीय अस्पृश्यांचा प्रस्न स्व. महर्षि शिंदे यांच्या १९३३ साली प्रकाशित झालेल्या संशोधनपर ग्रंथात सापडते.
महाराष्ट्र राज्याची सत्ता हातात आल्यावर वरील महार वतन बिल वेगळ्या नावाने यशवंतरावांनी पास करून घेतले व दलित मुक्तीचा एक टप्पा ओलांडला.
डॉ. आंबेडकरांच्या समाजाने सार्वजनिकपणे नवबुद्धधर्म स्वीकारला. यामुळे त्यांच्या सवलतीचा प्रश्न निर्माण झाला. दे. भ. यशवंतरावांनी या धर्मांतरामुळे काहीच प्रत्यक्ष फरक दलितांच्या जीवनात पडला नाही. आर्थिक क्रांती झाली नाही. हे ओळखिले म्हणून महाराष्ट्र राज्यात महार समाजाच्या सवलती ते बुद्धधर्म स्वीकार झाल्यानंतरही चालू ठेविल्या. पुरोगामी यशवंतरावांचे येथे दर्शन घडते आहे. समाजवादाकडे त्यांचा कल असे. त्यांनी सतत गांधी काँग्रेसमार्गी पवित्रा टिकविला जेधे यांच्यानंतर चव्हाणांच्यामुळे काँग्रेस खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेली एकशक्ती प्राप्त बनली. अजूनही ‘छाप’ कायम आहे.