४) यशवंतरावांचे समाजकारण मार्गदर्शक
‘यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्राला वारसा’ लेख मननीय व अभ्यासनीय वाटला. (सकाळ : १२-३-८८). यशवंतरावांचे पुरोगामी समाजकारण फक्त महाराष्ट्रालाच मार्गदर्शक आहे, असेच केवळ नव्हे. हा वारसा सर्व भारताने घेतला. तर त्याचा खात्रीने मनोविकास होऊ शकेल व तणाव कमी होतील. यशवंतरावांनी महाराष्ट्राला विशेषत: मद्रासप्रमाणे (तामिळनाडू) द्रविड मुन्नेत्र कळघमच्या धर्तीवर जाऊ दिले नाही. सत्यशोधक चळवळीत महाराष्ट्रात जो द्वेषाग्नी दोन्ही पक्षात उफाळत होता, त्याची जागा त्यांनी परस्पर प्रेम व सहकार्य यांनी भरून काढली. सातारा जिल्ह्याला नवे राष्ट्रीय गांधीमार्गी वळण लावले यातूनच नवे ग्रामीण पुढारी व कार्यकर्ते पुढे आले.
महर्षी शिंदे यांच्या दोन इच्छा होत्या पहिला त्यांचा विवेक असा होता की, बहुजन समाजाने स्वराज्य संपादनार्थ गांधी-नेहरूंच्या काँग्रेसमध्ये जावे. दुसरा मुद्दा असा होता की, ब्राह्मणेतर पक्षाचे कार्य संपल्यामुळे त्याने तो पक्ष बरखास्त करून खुद्द महाराष्ट्र काँग्रेस कबज्यात घ्यावी. जे समान हक्क मराठा-तत्सम हे स्वत: पुढे गेलेल्या समाजाकडून मागतात, ते समान हक्क, सामाजिक समन्याय व वागणूक पूर्वास्पृश्यांनाही द्यावी. यशवंतरावांच्या समन्वयात्मक सामाजिक धोरणाचा विचार केल्यास विठ्ठल रामजींच्या राजकीय समाजकारणाला यशवंतरावांनी यश आणून दिले. महार वतनासंबधीचे चव्हाणांचे कार्य व नवबौद्धांच्या सवली कायम ठेवण्याची त्यांची कामगिरी पाहता याची साक्ष पटते.
यशवंतरावांनी केंद्रात असताना राखीव जागांना आणखी दहा वर्षे मुदत वाढविण्याच्या बाजूने पुरस्कार केला. विशेषत: विठ्ठल रामजी व यशवंतराव यांचे राखीव जागांच्या संबंधीचे धोरण मराठा महासंघाने व इतर जे राखीव जागांना विरोध करतात, त्यांनी सर्वांनी लक्षात घ्यावे. डॉ. आंबेडकर, विठ्ठल रामजी व यशवंतराव यांना राखीव जागा व सवलती ‘कायमच्या’ असाव्यात, असे मुळीच अभिप्रेत नव्हते. राखीव जागांच्या प्रश्नांसंबंधाने महाराष्ट्राचा गुजरात झाला नाही. याचे श्रेय सर्व समाज सुधारकांकडेही जाते.
यशवंतरावांनी लोकमान्यांचे जहाल व लढाऊ राजकारण स्वीकारले. म. फुल्यांचे व शाहू करवीरकर यांचे सहकार्यवादी नेमस्त राजकारणाचा मार्ग पत्करला नाही. सयाजीराव गायकवाड व यशवंतराव यांच्यातही मोठे साम्य आढळते. सयाजीरावांचे बुद्धिवंतांना अतिशय साह्य झाले. मिळालेली सत्ता पुरोगामी समाजकारण व शिक्षणप्रसार याकामी दोघांनीही वापरली. विशेषत: महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची त्यांनी जी योजना कार्यवाहित आणली, त्यावरून हा मुद्दा स्पष्ट होतो.
केवळ पुतळे उभारून मोकळे न होता, यशवंतरावांतील वरील सर्व उत्कट व भव्य सर्वांनीच देशाहितार्थ अनुसरल्यास महाराष्ट्राचे व पर्यायाने सर्व देशाची समाजिक एकात्मता वर्धमान राहिल.
रा. ना. चव्हाण, वाई
(दैनिक ‘सकाळ’ १८ मार्च १९८८)