सत्तेचा लोकहितार्थ वापर
मुख्यमंत्री झाल्यावर मिळालेल्या सत्तेचा वापर यशवंतारावानी बहुलोकहितार्थ केला. त्यांनी सहकारी चळवळ वाढविली. मागे सत्यशोधक परिषदातून ग्रामपंचायती असाव्या. सहकारी सोसायट्या काढाव्यात असे ठराव झाले होते. “महाराष्ट्राचे जे प्रश्न तेच मराठ्यांचे प्रश्न व मराठ्यांचे जे प्रश्न तेच महाराष्ट्राचे प्रश्न” असे कर्मवीर शिंदे म्हणत असत. यशवंतराव मोहिते-बाळासाहेब देसाई वगैरेना घेऊन महाराष्ट्रावर यशवंतरावानी त्यांचे राज्यच स्थापिले. ना. ग. गोरे व एस्. एम्. यानाही यशवंतरावांची ही पक्कड मोठी आश्चर्याची व बिकट वाटे. जोशी एस्. एम्. यांनाही (मनात) ब्राह्मण मुख्यमंत्री कधी होणार याची काळजी वाटे. नवशक्तीने त्या काळात त्यांच्या इच्छेविरूद्ध खंडणात्मक अग्रलेखही लिहिला होता. फक्त तर्कतीर्थ यानी यशवंतरावांच्या बाजूचे राजकारण केले. या त्यांच्या पवित्र्याचा त्याना फायदा झाला. आजही यशवंतरावांच्या पंचायत राज्याच्या बाजूने तर्कतीर्थ प्रतिपादन करीतात. भारतातील लोकशाही टिकविण्याचा आणि वाढविण्याचा हाच एक मार्ग आहे. हा मजबूत झाला पाहिजे हे खरेच. चव्हाणांचे इंग्लंड-अमेरिका वगैरे दौरे देखील त्यांचे व्यापकपण वाढविते झाले.
ब्रिटीश राज्य झाल्यावर बडोद्यात सयाजीराव गायकवाड यांच्याकडे संस्थानी सत्ता गेली. ती त्यांनी शूद्रातिशूद्रांच्या उन्नतीसाठी वापरली. नंतर राजर्षि शाहू यांनी अशीच वापरली. सयाजीराव गायकवाड सामंजस्यवादी होते. त्यांनी फक्त ब्राह्मणविरोधच सतत न करीता पुढे जोतिबांच्या विचाराच्या मागे जो शिक्षणप्रसाराचा मुद्दा होता तो पकडला व महाराष्ट्रातील शिक्षणप्रसारकांना मनस्वी साह्य केले. कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या प्रमाणे उच्चभ्रू पुणेकर यांचा विरोध ओढवून न घेता महाराष्ट्रातील अनेक ब्राह्मण विद्वान पंडित यांचा विश्वास संपादन केला. बडोद्याच्या वेदोक्त प्रकरणानंतर सयाजीरावानी मुत्सद्दीपणाने पुण्याचा ‘केसरी’ आपलासा केला. यशवंतरावांनी देखील हेच यश नंतर मिळविले. दोघेही हे सत्तावंत मराठे सुशिक्षित, सुविद्य, साहित्यकला प्रेमी व गुणग्राहक होते. जातीच्या पलीकडे गेले होते. गुणवत्तेचे चहाते होते. शिवाजी-सयाजीराव – यशवंतराव ह्यांच्यात हे सर्वगुण होतेच. या कोणतीही सांप्रदायिकता नव्हती. हे सर्व आदर्शच राहतील. यांच्याकडे पाठ करून चालणार नाही.
यशवंतरावाच्या घरी वारकरी सांप्रदायिकता नव्हती. सत्यशोधक चळवळीचा प्रभाव होता म्हणून यशवंतरावाना शिक्षण दिले पाहिजे असे त्यांच्या घरातील लोकांना वाटले. महाराष्ट्रातील बहुजनसमाजाच्या चळवळीला राष्ट्रीय स्वरूप आणण्याचे कार्य यशवंतरावांच्यामुळे पुढे जास्ती शक्य झाले. ना. कै. यशवंतराव हे देखील आतून जातियवादी होते असा संशय वरिष्ठ थरातून व्यक्त होतानाही आढळेल. पण यशवंतरावानी शिवाजी छत्रपती प्रमाणे ब्राह्मणांचा सांभाळ केला. त्यांच्यातील पुष्कळांना नोक-या लाविल्या. लो. टिळकांच्या स्मारकाला मोठी मदत केली. यामुळे ब्राह्मणांकडून यशवंतरावाना विरोध होण्याचे प्रसंग आलेच नाहीत. त्यांनी एका शंकराचार्याला मद्रासमध्ये कैद (अटक) करून ठेविले व अस्पृश्यता निवारणाची बाजू घेतली. तरी त्यांच्याविरूद्ध उठाव झाला नाही. शंकराचार्यांना जी अटक केली तिची तरफदारी वाईच्या गणपती घाटावरील एका व्याख्यानात तर्कतीर्थांनी देखील केली. मी एक श्रोता होतो. प्रत्यक्ष ऐकिले. पूर्वीचा दुर्दैवी ब्राह्मण – अब्राह्मणवाद उपस्थित न होईल अशी ‘दक्षता’ यशवंतरावानी घेतली. मात्र बहुजन समाजातील खेड्यापाड्यापर्यंतचे कार्यकर्ते एक केले. त्याना विकासाच्या कार्याला जुंपले. मराठा-मराठेतर असाही विकल्प न धरिता त्यानाही मंत्रिमंडळात घेतले.