५. महाराष्ट्राचा जाणता राजा
कै. यशवंतराव बळवंतराव चव्हाम हे देवराष्ट्रे नामक खेडेगावांत जन्म पावले. हे गांव कराड तालुक्यात आहे. या गावाच्या नावांत देव व राष्ट्र राष्ट्रे असे दोन शब्द आहेत. यशवंतराव संपूर्णपणे दैववादी नव्हते. देववादी मात्र होते. शिंगणापूर-पंढरपूर-प्रतापगडची भवानी यांचे ते अधूनमधून दर्शन घेत. मूर्तिपूजा म्हणून नव्हे तर देवत्वाचे दर्शन घेण्याची ओढ, राजकारणात व्यग्र असलेल्या यशवंतरावांना होती. ते पाखंडी वा नास्तिक नव्हते. त्यांच्याविषयी त्यांच्यात ज्या धर्मभावना होत्या. त्या अर्थात वैयक्तिक होत्या. शिवाजी हा त्याचा एक आदर्श असे व त्यांच्यात परधर्मसहिष्णुता असे. उदा. पाटण तालुक्यात एका पिराला त्यानी हिरवी चादर घातली. त्यांच्या ठायी धर्मभेद नसे. पण ते कोणत्याही संप्रदायाचे नव्हते. त्यांच्या घरी पंढरपूरच्या वारकरी पंथाचा माळकरी परिणाम किंवा परंपरा नव्हती. यशवंतरावजी (देव) राष्ट्र येथे केवळ जन्मले; एवढेच नव्हे तर ते राष्ट्रीय वृत्तीचे आजन्म राहिले.
उलट त्यांचे बंधू क-हाड व क-हाड तालुक्यातील सत्यशोधक चळवळी भाग घेणारे सामाजिक सुधारणेच्या बाजूचे होते. अर्थात त्याकाळी ‘विजयी मराठा’, ‘राष्ट्रवीर’, मजूर वगैरे ब्राह्मणेतरी सत्यशोधक चळवळीची मुखपत्रे यशवंतरावांना विद्यार्थी असताना वाचावयास मिळत. खुद्द कै. भाऊसाहेब कळंबे यांचे ‘कैवारी’ पत्र कराड येथून निघे. राजर्षि शाहू महाराजांच्या पश्चातही (१९२२ नंतरही) सातारा जिल्ह्यात ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळीचा जोर होता. नाही म्हटले तरी वरील घरच्या-दाराच्या चळवळीच्या त्यांच्यावर पहिला परिणाम झालाच होता. हे त्यांनी त्याच्या आत्मचरित्राच्या ‘कृष्णाकाठ’ ह्या पुस्तकात लिहिले आहे. वरील काळात सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर कै. ना. भास्करराव जाधव यांचा प्रभाव होता. घरीदारी तालुक्यात व जिल्ह्यात फार काय सर्व महाराष्ट्रात व-हाड नागपूरपर्यंत व खाली बेळगाव-कारवारपर्यंत ब्राह्मणेतर चळवळ चालू होती. साता-यास मद्रासकडील एका नामवंत जस्टीस पार्टीच्या ब्राह्मणेतर पुढा-याच्या अध्यक्षत्वाखाली ब्राह्मणेतर पक्षीय अधिवेशही झाले होते व ह्या मोठ्या सभेस यशवंतरावांना उपस्थित राहण्याचा योग प्राप्त झाला होता. प्राथमिक व पुढचे इंग्रजी शिक्षण चालू असतांना वरील वातावरण आजूबाजूला घरीदारी होते तरी वरील चळवळीचे त्यानी तरूणपणी व पुढील व पुढील आयुष्यातही नेतृत्व पत्करीले नाही किंवा प्रत्यक्ष विरोधही केला नाही| आत्मा अनुभवी| चोखाळिल्या वाटा||’ अशा प्रकारची बौद्धिक शक्ती त्यांना प्राप्त होती.
कराड तीर्थक्षेत्र
कराड हे धर्मक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते व यद्यपी कराडचा ‘कृष्णाकाठ’ पवित्रच समजला जातो. यशवंतराव सर्वसामान्य परिस्थितीतून वर आले. गरीबी फार होती, तरी कोल्हापूर व पुणे जाऊन त्यानी बी. ए., एल्. बी. अखेरपर्यंत जिद्दीने शिक्षण पुरे केले. त्यांना उपजत विद्याभ्यासाची, वाचनाची व पुढे भाषण लेखन करण्याची आवड होती. टिळक हायस्कूलमधील वातावरणात यशवंतराव शिक्षितव बहुश्रुत झाले. ज्ञानार्जनाची त्यांना हौस होती. शेवटपर्यंत विद्यार्थी राहिले. म्हणजे विविध व नवे नवे ग्रंथ पुस्तके ते वाचीत. राजकारणाचा विळखा होता तरी त्यांची ज्ञानपिपासा लहान नव्हती.