कथारुप यशवंतराव- जीव लावणारा नेता.

जीव लावणारा नेता.

१९५७ सालची गोष्ट. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्र समितीने काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे केले होते. यशवंतरावांचे प्रचारदौरे सुरू होते. त्यावेळी हिंगोली मतदारसंघातून नारायण गोरेगावकर उमेदवार म्हणून उभे होते. त्यांना पोटाचा विकार होता. यशवंतराव त्यांच्या प्रचारासाठी हिंगोलीला गेले, तेव्हा त्यांना म्हणाले, ' गोरेगावकर, आता मतदारसंघ पिंजून काढा.' गोरेगावकर  खालच्या आवाजात म्हणाले, ' साहेब , मला पोटाचा विकार असल्याने प्रचाराची दगदग सोसवत नाही. तरीही मी जमेल तेवढा लोकसंपर्क साधतो.'

ते बोलणे तिथेच थांबले. यथावकाश निवडणुका झाल्या. गोरेगावकर निवडून आले. आमदार झाले. मुंबईला आले. काही दिवसांपूर्वी यशवंतरावांशी झालेले संभाषण ते विसरून गेले होते. पण यशवंतराव विसरले नव्हते. विधानसभेच्या बैठकीच्या पहिल्याच दिवशी यशवंतरावांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तपासणीची सोय केली आणि त्यांना तिथे घेऊन जाण्यासाठी आपले सचिव डोंगरे यांना पाठवले. तिथे गोरेगावकरांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या शस्त्रक्रियेचा खर्चदेखील यशवंतरावांनी गोरेगावकरांवर पडू दिला नाही. आपल्या कार्यकर्त्यांच्या वेदना जाणणारा, त्यावर मायेने फुंकर घालणारा असा नेता विरळाच  !