ही माझी नीती नाही !
१९५७ च्या सुमारास महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भाऊसाहेब हिरे व यशवंतराव चव्हाण असे दोन गट निर्माण झाले होते. एका वर्षापूर्वीच द्विभाषिकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी दोघांमध्ये अटीतटीची स्पर्धा झाली होती व त्यात यशवंतरावांचा विजय झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी भाऊसाहेबांच्या कन्येचे लग्न ठरले. विवाह समारंभ मालेगाव येथे संपन्न होणार होता. भाऊसाहेबांनी यशवंतरावांना आग्रहाचे निमंत्रण दिले. यशवंतरावांनीही लग्नाला उपस्थित राहण्याचे ठरवले. ही बातमी वसंतराव नाईक वगैरे लोकांना समजल्यावर त्यांनी यशवंतरावांकडे धाव घेतली. सगळेजण म्हणाले, ' साहेब, काय वाट्टेल ते झाले तरी तुम्ही या समारंभाला जाऊ नका. त्याचा फायदा भाऊसाहेब हिरे जिल्ह्यातील आपले वजन वाढविण्याकरिता करतील.' पण यशवंतरावांनी या सल्ल्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले. ते ठरल्याप्रमाणे लग्नाला गेले.
यशवंतराव आल्याने सर्वांनाच बरे वाटले. भाऊसाहेबांना खूप आनंद झाला. त्या समारंभात वि. वा. नेने नावाचे यशवंतरावांचे जुने मित्र त्यांना म्हणाले, ' तुम्ही या लग्नाला येणार नाही, असा जोरात प्रचार या बाजूस चालला होता. पण शेवटी तुम्ही आलातच तर.' साहेब म्हणाले, ' हे बघ बापू, माझे व भाऊसाहेबांचे मतभेद आहेत हे खरे, पण ते राजकीय पातळीवर आहेत. त्यांचे आणि माझे वैयक्तिक भांडण थोडेच आहे ? विवाह समारंभ हा खाजगी समारंभ आहे. त्याच्यात राजकारण आणणे योग्य नाही. ही माझी नीती नाही. असे वागण्याची माझी पद्धत नाही.'
राजकीय मतभेदांमुळे वैयक्तिक संबंधात दुरावा निर्माण होऊ द्यायचा नाही, हे पथ्य यशवंतरावांनी आय़ुष्यभर पाळले.