कथारुप यशवंतराव- मी जनतारूपी दुधावरची साय आहे !

मी जनतारूपी दुधावरची साय आहे !
 
सन १९५५ नंतर संयुक्त महाराष्ट्राची मागणी जोर धरू लागली. एस. एम. जोशी, सेनापती बापट इत्यादी ज्येष्ठ नेत्यांचे नेतृत्व लाभल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचा लढा बघता बघता जनतेचा लढा बनला. अशा वातावरणातच १९५७ ची विधानसभा निवडणूक झाली व यशवंतराव दुस-यांदा मुख्यमंत्री बनले. संयुक्त महाराष्ट्र यशवंतरावांनाही हवाच होता, पण त्यांचा मार्ग वेगळा होता. अगोदर द्विभाषिक राज्य चांगले चालवू व नंतर नेहरूंचे मन वळवून संयुक्त महाराष्ट्र मिळवू अशी त्यांची भूमिका होती. प्रतापगडावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पं. नेहरू आले असताना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय शांततामय पण अतिशय प्रभावी निदर्शने केली. त्यानंतर पं. नेहरूंनी यशवंतरावांशी महाराष्ट्राच्या निर्मिती विषयी गांभीर्याने चर्चा केली.संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती फायदेशीर असल्याचे यशवंतरावांनी नेहरूंना पटवून दिले आणि अखेर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचे श्रेय घेण्याची स्पर्धाच लागली. पण यशवंतरावांनी कधीही स्वत:च्या योगदानाची जाहिरात केली नाही. या काळात त्यांना अपार मानसिक त्रास झाला. पण संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचे श्रेय त्यांनी जनतेला दिले. सांगलीमध्ये एका सभेत अनेक वक्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणल्याबद्दल यशवंतरावांवर स्तुतीसुमने उधळली. पण त्याच सभेत बोलताना अतिशय नम्रपणे यशवंतराव म्हणाले, ' संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न मी सोडविलेला नाही. महाराष्ट्रातील चार कोटी जनतेचे ते श्रेय आहे. मी म्हणजे जनतारूपी दुधावरची साय आहे. दूधच नसेल तर साय कोठून येईल ?'