स्वराज्य सर्वांच्या कल्याणासाठी आलेय !
१ नोव्हेंबर १९५६ रोजी यशवंतराव द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची मागणी वाढू लागली होती. अशातच १९५७ साली विधानसभेची निवडणूक लागली. जनमत काँग्रेसला अनुकूल नव्हते. यशवंतराव स्वत: कराड मतदार संघातून उभे राहिले. गावोगाव प्रचारसभा घेऊ लागले.
एके दिवशी कराड जवळच्या शामगाव येथे प्रचारासाठी ते गेले. गावक-यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मिरवणूक काढली. पण वेशीजवळ हरिजनांचा समूह स्तब्ध उभा होता. त्यांनी प्रचार सभेवर बहिष्कार टाकला होता. यशवंतराव अस्वस्थ झाले. सभास्थानाकडे जाण्याअगोदर त्या लोकांजवळ गेले. त्यांची विचारपूस केली. त्यांचा म्होरक्या म्हणाला, ' साहेब, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. मतदानसुद्धा तुम्हालाच करणार आहोत, पण तुम्ही आमची व्यथा ऐकून घ्या. आम्ही लोकांनी गावात कसे यावे ? आम्हाला गावात यायला बंदी आहे, आमच्यावर गावाने बहिष्कार टाकलाय. आम्हाला आडावर पाणी भरू दिले जात नाही. शेतावर मजूरी मिळत नाही. मुलांना शाळेत बसू देत नाहीत. पोळ्याला आम्ही आमच्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली म्हणून गावकरी रागावलेत. तुम्हीच सांगा, आम्ही काय करू ?'
स्वतंत्र भारतातील जातीय तणाव पाहून यशवंतरावांना अपार वेदना झाल्या. त्यांनी हाताला धरून त्यांना सभास्थानी नेले. सभा सुरू झाली. आपल्या भाषणात साहेब म्हणाले, ' गावकरी बंधूंनो, तुम्ही मला मतदान करणार यात मला आनंद नाही. कारण तुम्ही तुमच्या गावात गुण्यागोविंदाने वागत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या एका भावाला बरोबरीची वागणूक देत नाही, तोपर्यंत तुमच्या प्रेमाचा व तुमच्या मताचा मला काय फायदा ? स्वराज्य सर्वांच्या कल्याणासाठी आलेय. मोठेपणाच्या जुन्या कल्पना सोडून द्या. गांधीजींचा त्याग आठवा.'
यशवंतरावांचे हे आवाहन लोकांच्या हृदयाला भिडले. त्यांनी हरिजनांना सामावून घेतले. मते मागण्यासाठी गेलेले यशवंतराव मतदारांचीच कानउघडणी करून आले.