कथारुप यशवंतराव- माधवरावांचे आयुष्य वाढवा !

माधवरावांचे आयुष्य वाढवा  !

१९५७ साली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. संयुक्त महाराष्ट्र समिती व शेतकरी कामगार पक्ष यांची  शक्ती वाढली होती. समितीकडे आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, एस. एम. जोशी, नाना पाटील, भाई माधवराव बागल या मैदान गाजविणा-या वक्त्यांची मोठी फौज होती. सातारा , सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात भाई माधवराव बागल यांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार प्रचार सुरू केला होता. यशवंतराव कराड मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे होते. माधवरावांनी याच मतदारसंघातील मसूर गावी प्रचारसभा घेतली. भाषणाच्या शेवटी ते म्हणाले, ' बांधवांनो, माझे आता वय झाले आहे. पण यशवंतराव चव्हाणांना तुम्ही हरवलेले मी माझ्या डोळ्यांनी पाहीन, तेव्हाच सुखाने मी डोळे मिटेन.'

त्यानंतर दोन -तीन दिवसांनी त्याच गावात यशवंतरावांची प्रचार सभा होती. माधवराव बागल यांच्या भाषणाविषयीची व त्यांनी केलेल्या आवाहनाविषयीची माहिती काही कार्यकर्त्यांनी यशवंतरावांना दिली होती. आपल्या मुद्देसूद भाषणाच्या शेवटी यशवंतराव मिश्किलपणे म्हणाले, ' भाई माधवराव बागल मला वडीलबंधूप्रमाणे आहेत. त्यांनी एवढ्या लवकर डोळे मिटावेत असे मला वाटत नाही. म्हणून तुम्ही मला मत देऊन त्यांचे आयुष्य वाढवा.'

सभ्यता न सोडता विरोधकांना गारद करण्याचे कसब यशवंतरावांच्या अंगी होते. त्यांच्या युगप्रवर्तक नेतृत्वाचे हेच वैशिष्ट्य होते.