कथारुप यशवंतराव-हजरजबाबी यशवंतराव

हजरजबाबी यशवंतराव

१ नोव्हेंबर १९५६ रोजी यशवंतरावांनी द्विभाषिक मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली, त्यानंतर मंत्रिमंडळ निवडीचे व खातेवाटपाचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होते. यशवंतरावांनी गुजरात, सौराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा सर्व विभागातील प्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान दिले. मंत्रिमंडळात कार्यक्षमता व एकोपा राहील हे पाहिले. भाऊसाहेब हिरे, बियाणी, हैदराबादचे माजी गृहमंत्री दिगंबरराव बिंदू हे मातब्बर पुढारी मंत्रीमंडळात नव्हते. याचे अनेकांना आश्चर्य वाटले. पण पक्षांतर्गत मतभेदाचे प्रतिबिंब मंत्रिमंडळात उमटू नये म्हणून यशवंतरावांनी त्यांना वगळले . अर्थात याला इतरही राजकीय कारणे असतील.

एकदा विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार कांबळे म्हणाले, ' हे मंत्रिमंडळ प्रातिनिधिक नाही. १११ आमदारांचा पाठिंबा असणा-या भाऊसाहेब हिरे यांचा समावेश मंत्रिमंडळात का केला नाही ?'
समोर बसलेले यशवंतराव ताडकन् म्हणाले, ' विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला हवी ?' या टोल्याने सभागृहात हशा पिकला व प्रश्नकर्त्या आमदाराचा चेहरा केविलवाणा झाला.

जनतेने काँग्रेसला बहुमत दिले असून मंत्रीमंडळ निवडणे हा सत्ताधारी पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यात विरोधकांनी ( ज्यांचा जनतेने पराभव केला आहे ) नाक खूपसू नये असे यशवंतरावांना सुचवायचे होते.