कथारुप यशवंतराव- सर्वच कर्ज माफ करून टाकू !

सर्वच कर्ज माफ करून टाकू !

३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे नावाच्या माथेफिरू तरुणाने महात्मा गांधीजींची हत्या केली. सारा देश दु:खाने व संतापाने थरारून गेला. महाराष्ट्रात तर आगडोंबच उसळला. नथुराम ब्राह्यण होता, म्हणून महाराष्ट्रात गावोगावी ब्राह्यणांची घरे जाळली जाऊ लागली. कित्येक ब्राह्यण कुटुंबं खेडी सोडून शहरात आश्रयाला आली. त्यामुळे त्यांच्या स्थावर मालमत्तेची मात्र जाळपोळीमुळे प्रचंड हानी झाली. बहुजन समाजाच्या मनात असलेला ब्राह्यणांविषयीचा रागच या निमित्ताने उफाळून आला होता. या जाळपोळीत ज्यांचे नुकसान झाले होते अशा लोकांना त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने कर्ज दिले होते. पण ब-याच कर्जदारांना कर्जाची परतफेड करता आली नव्हती. यापैकी काही कर्जदार, तत्कालीन विरोधी पक्षनेते एस. एम. जोशी यांना भेटले. त्यांचे म्हणणे असे होती की आम्ही निम्म्यापेक्षा अधिक कर्ज फेडले आहे, पण आता आमची शक्ती संपलेली आहे. आम्हाला सूट मिळावी म्हणून काहीतरी खटपट करा.

त्यानंतर काही दिवसांनी एस. एम. जोशींनी यशवंतरावांजवळ हा विषय काढला आणि असे सुचविले की ज्यांनी निम्म्याहून अधिक कर्ज परत केले आहे, त्यांचे उरलेले कर्ज माफ करावे. यावर यशवंतरावांनी थोडा वेळ विचार केला व म्हणाले, ' असे कशाला आण्णा ? आपण सर्वच कर्ज माफ करून टाकू  ! ' आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी कर्जमाफीची घोषणा ही करून टाकली  !