शंभरभर रुपये आणावे !
१९४६ च्या विधानसभा निवडणुकीत यशवंतरावांना कराड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली. ते निवडून आले व मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी त्यांना पार्लमेंटरी सेक्रेटरी केले. यशवंतराव मुंबईला राहू लागले. तुटपुंज्या उत्पन्नामुळे मुंबईत कुटुंबाचे पालन- पोषण करणे अशक्य ठरल्यानं त्यांनी कुटुंबकबिला कराडातील घरीच ठेवला.
१९४५ साली यशवंतरावांच्या थोरल्या बंधूंना क्षयाची बाधा झाली. वेणूताईंनी त्यांची उत्तम शुश्रुषा केली पण त्यामुळे त्यांनाही क्षयरोग झाला. या काळात दवाखान्याचा खर्च फार वाढला होता. आर्थिक ओढाताण सुरू होती. आज कदाचित कुणालाच हे खरे वाटणार नाही, पण आमदार असताना यशवंतराव मुंबईत कधी एकवेळ जेवत होते, तर कधी मित्राच्या डब्यातील अर्धा डबा खात होते. अशा अवस्थेत २६ जुलै १९४९ रोजी यशवंतरावांनी वेणूताईंना पत्र लिहिले. त्यात त्यांनी लिहिले होते-
' मी सध्या सकाळ - संध्याकाळ नाना कुंटे यांच्याकडे जेवण करतो. त्यांनी फारच आग्रह केला म्हणून जातो आहे. मनातून मात्र अस्वस्थ आहे. नात्यातली इथली मंडळी भेटून जेवायला बोलावतात. बहुधा तू त्यांना लिहिले असावेस. परंतु या लोकांना मी साफ नकार दिला. या आठवड्यात तुमची पैश्याची ओढाताण झाली असेल. गौरीहर ( सिंहासने ) कडे कोणाला तरी पाठवून शंभरभर रुपये आणावे. काय करीत आहात ते कळवा.'
स्वत: आमदार असतानाही यशवंतरावांची आर्थिक स्थिती किती कमकुवत होती हेच वरील पत्रातून लक्षात येते.