सजग वाचक यशवंतराव !
यशवंतराव महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुरवठा मंत्री होते तेव्हाचा हा प्रसंग . त्यावेळी यशवंतराव वेणूताईंसह मुंबईतच रहात होते. यशवंतरावांचे भाचे आणि स्वातंत्र्यसैनिक बाबुराव कोतवाल हे देखील तेव्हा त्यांच्या घरीच रहात होते.
एके दिवशी यशवंतराव सचिवालयातून घरी आले. सौ. वेणूताईंबरोबर चहा घेताना ते म्हणाले, ' वेणूबाई, आमचे एक काम कराल ना ?'
अनेक वर्षांच्या सहवासामुळे यशवंतरावांचे ' एक काम ' काय असेल हे ओळखायला वेणूताईंना मुळीच वेळ लागला नाही.
त्या लगेच म्हणाल्या , ' पुस्तके आणायची असतील, पाठवते .'
मग वेणूताईंनी शिपायाला बोलावले. साहेब बाबुरावला म्हणाले, ' बाबुराव , मी सांगतो ती नावे एका कागदावर लिही, आणि याच्याबरोबर जाऊन ती दोन पुस्तके घेऊन ये. ' बाबुराव कागद व पेन घेऊन बसल्यावर साहेबांनी ' The Bridge on the River Quie ' आणि From Here to Eternity ' अशी दोन पुस्तकांची नावे सांगितली.
सौ. वेणूताईंनी दिलेले पैसे घेऊन बाबुराव आणि शिपाई बुक स्टॉलमध्ये गेले. शिपायाने ती चिठ्ठी दुकानदाराला वाचून दाखविली. दुकानदार थक्कच झाला. म्हणाला , ' चव्हाण साहेबांना पाहिजेत काय ? ' शिपाई म्हणाला , ' हो '.
दुकानदार कौतुकाने म्हणाला , ' चव्हाणसाहेब मोठा ग्रेट माणूस आहे , अहो, ही पुस्तके दहा बारा दिवसांपूर्वीच प्रकाशित होऊन आजच आमच्याकडे आली आहेत.' यशवंतरावांमधील वाचक असा सजग आणि नाविन्याची ओढ असणारा होता.