लोककलांचा विकास
तमाशा ही महाराष्ट्राची दुर्लक्षित लोककला आहे. अभिजनांना ती आपली वाटत नाही आणि बहुजनांना ती आपली वाटते. पण तिला आश्रय देणे जमत नाही. १९४६ साली यशवंतराव विधानसभेत निवडून आले आणि पार्लमेंटरी सेक्रेटरी बनले. तमाशा या लोककलेला तेव्हा प्रतिष्ठा नव्हती. मुळात तमाशाला लोककला मानायलाच सरकार तयार नव्हते. यशवंतरावांनी या लोककलेबाबत एक सविस्तर नोट तयार केली. तमाशाला लोककला म्हणून मान्यता देणे कसं योग्य ठरेल याचं विश्लेषण त्या टिपणीमध्ये केलं होतं. या टिपणीचं हस्तलिखित तयार झाल्यावर ते टाईप करण्यासाठी त्यांनी मोरारजी देसाई यांच्याकडे टायपिस्टची मागणी केली. मोरारजींनी श्रीपाद डोंगरेंना यशवंतरावांकडे पाठविले . अशाप्रकारे ती नोट प्रथम मोरारजींकडे व नंतर मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्याकडे पाठविली गेली. मुख्यमंत्र्यांनी त्यावर ट उत्कृष्ट ' असा शेरा मारून ती नोट परत पाठविली, पण पुढे काहीच कार्यवाही झाली नाही.
काही दिवसांनी यशवंतरावांनी ती नोट परत मोरारजींकडे पाठविली. मग मोरारजींनी बाळासाहेब खेर यांच्याकडे न पाठविता त्यावर निर्णय दिला आणि महाराष्ट्रात तमाशा बोर्ड निर्माण झाले. पुढे मुख्यमंत्री झाल्यावर यशवंतरावांनी लोककला आणि लोकसाहित्यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्याची सुरुवात या टिपणापासून झाली होती.