विभाग दुसरा - सागरतीर
( १९४६ ते १९६२ )
नियतीचा हात
१९४६ सालची विधासभेची निवडणूक यशवंतरावांनी लढविली आणि ते विजयी झाले. मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी त्यांना पार्लमेंटरी सेक्रेटरी केले. एक वर्ष निघून गेले आणि मोरारजी देसाईंनी त्यांना गृहखात्यात उपमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. या त्यांच्या उत्कर्षाच्या काळात कराड- वाळवा भागातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये यादवी सुरू झाली. यशवंतरावांचे जिवलग मित्र ; कामेरीचे के. डी. पाटील यांची हत्या झाली. हा सूडाचा प्रकार होता. त्यापूर्वी आमदार चंदू पाटील यांचा खून झाला होता. त्यांच्या खुनाचा आळ के.डी. पाटील यांच्यावर आला. यशवंतराव हे के. डी. पाटील यांच्या गटाचे म्होरके मानले जात होते. त्यामुळे त्यांच्यावरही हत्येचे संकट कधीही ओढवू शकणार होते. एकदा वडील बंधूंची विचारपूस करण्यासाठी यशवंतराव कराडला आले. त्यावेळी ते कल्याणी बिल्डींगमध्ये राहत होते. यशवंतरावांनी गणपतरावांशी मनोकळ्या गप्पा मारल्या. नंतर खोलीबाहेर येऊन सिगारेट पेटवली. अंधार पडू लागला होता. त्या इमारतीच्या गच्चीवरून सभोवतालच्या शिवाराकडे पहात यशवंतराव उभे होते. विचारांची तंद्री लागलेली असताना अचानक त्यांना दूरवर रेल्वे स्टेशनचा सिग्नल दिसला. का कोण जाणे, पण आपण ताबडतोब कराड सोडले पाहिजे असे त्यांच्या मनाने घेतले. त्यांनी तात्काळ रेल्वे स्टेशनचा रस्ता धरला. त्यांची बहिण त्यांना जाऊ देत नव्हती, पण त्यांनी तिचे ऐकले नाही. कराड स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या गाडीत ते शिरले आणि पुण्याला निघून गेले. इकडे कराडमध्ये त्याच रात्री भीषण प्रसंग घडला. यशवंतराव कल्याणी बिल्डींगमध्ये आले आहेत ही बातमी विरोधी गटाला कळाली. मध्यरात्री दोनच्या सुमारास सहा धिप्पाड तरूण बंदुका, भाले व कु-हाडी घेऊन कल्याणी बिल्डींगवर चाल करून आले. त्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. ही बातमी गावात पसरली, पोलिसांपर्यंत पोचली. यशवंतरावांना विरोधकांनी पळवून नेले असा लोकांचा समज झाला. त्यांचा शोध सुरू झाला. सर्वत्र तारा झाल्या. यशवंतराव पुण्याच्या रेस्ट हाऊसमध्ये झोपी गेले होते. पुण्याच्या पोलिसांनी कराडच्या पोलिसांना खुशालीची बातमी दिली. भीषण प्रसंग टळला. यशवंतरावांच्या अंतर्मनाने एकाएकी त्यांना कराड सोडण्याचा आदेश का दिला या गूढ इशा-याचा अर्थ समजून घेण्याचा यशवंतरावांनी खूप प्रयत्न केला आणि शेवटी ते म्हणाले, ' तो खुणेचा हात नियतीचा होता.