कथारुप यशवंतराव- मूलभूत प्रश्नांची जाण !

मूलभूत प्रश्नांची जाण !

१९४६ साली विधासभेच्या निवडणुका झाल्या आणि बहुमत मिळवून काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळात यशवंतराव पार्लमेंटरी सेक्रेटरी ( संसदीय सचिव ) म्हणून काम पाहू लागले.

सेक्रेटरी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दुस-या दिवशी एका परदेशी पत्रकाराने यशवंतरावांना विचारले, ' तुम्ही तुमच्या देशातील लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी कोणता क्रांतिकारक कार्यक्रम राबवीत आहात ?' पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची यशवंतरावांची ही पहिलीच वेळ होती. अनपेक्षितपणे विचारलेल्या या प्रश्नाने ते काहीस गोंधळले व मग गंभीर मुद्रा करून ते म्हणाले, ' आम्ही आमच्या देशात पहिला क्रांतिकारक कार्यक्रम राबविला- लोकांना प्यायला पाणी देण्याचा कार्यक्रम. ' त्यावर पत्रकार हसू लागला. यशवंतरावही हसू लागले. मग म्हणाले, ' अहो, विमाने बांधण्याइतकेच लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे महत्त्वाचे आहे.'

राज्यासमोरील मूलभूत प्रश्नांची यशवंतरावांना उत्तम जाण होती आणि कोणत्या योजना प्राधान्याने राबवायच्या याचे त्यांना भान होते.