कथारुप यशवंतराव- अखेरपर्यंत एकमेकांसाठी ... !

अखेरपर्यंत एकमेकांसाठी ... !

१९४९ सालची गोष्ट. यशवंतराव तेव्हा पार्लमेंटरी सेक्रेटरी होते. ते मुंबईत एकटेच रहात होते. वेणूताईंना क्षयाची बाधा झाली होती म्हणून त्यांना मिरजेच्या दवाखान्यात दाखल केले होते. हा यशवंतरावांच्या जीवनातील मोठा खडतर काळ होता. ते शरीराने मुंबईत असले तरी त्यांचे सगळे लक्ष कराडमध्ये व मिरजेमध्ये लागले होते. प्रदीर्घ उपचारानंतर डॉक्टरांनी वेणूताईंना विश्रांतीसाठी घरी घेऊन जायला सांगितले. त्यांना घेऊन येण्यासाठी यशवंतराव मुंबईहून मिरजेला गेले. शहराबाहेरील माळावर एका मोकळ्या व हवेशीर जागेत क्षयरोग झालेल्या रुग्णांची राहण्याची व्यवस्था केली होती. तिथेच एका छोट्याशा खोलीत लोखंडी खाटेवर वेणूताई झोपून होत्या.

यशवंतराव कॉटवर बसले. ती वैशाखातील एक उदास दुपार होती. वारा स्तब्ध होता. यशवंतरावांनी वेणूताईंच्या प्रकृतीची चौकशी केली. वेणूताईंनी तब्येतीची एकूण अवस्था सांगितली. यशवंतराव चेह-यावर हसू आणत म्हणाले, ' तू लवकर बरी होशील. ' काही क्षण असेच निघून गेले. मग वेणूताई म्हणाल्या, ' डॉक्टर म्हणतात, यापुढे संतती होण्याचा संभव नाही. ' यशवंतराव स्तब्ध बसून होते.

मग थोडे थांबून त्या म्हणाल्या, ' तुम्हाला वंशाचा दिवा पाहिजे. तुम्ही दुसरं लग्न करा. ' यशवंतरावांची स्तब्धता जरासुद्धा ढळली नाही. पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू पाझरत होते. वेणूताईंनी काहीशा आग्रही स्वरात पुन्हा तेच सांगितलं , तेव्हा स्थिर व दृढनिश्चयी स्वरात ते म्हणाले , ' मला वंशाच्या दिव्याची आवश्यकता नाही. येथून पुढे तुला मी आणि मला तू. हा विषय इथे बंद  ! '

त्या ओसाड माळावर भर दुपारी वेणुताईंना दिलेला शब्द यशवंतरावांनी आय़ुष्यभऱ पाळला. शेवटपर्यंत ते दोघे एकमेकांसाठी जगले  !