कथारुप यशवंतराव-तुम्हालाही आया बहिणी आहेत !

तुम्हालाही आया बहिणी आहेत !

सन १९४२ च्या ' चले जाव ' चळवळीत यशंवतरावांनी उडी घेतली. सरकारने क्रांतीकारकांची धरपकड सुरू केल्यावर ते भूमिगत झाले. इंग्रज सरकारने त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना अटक करायला सुरूवात केली. काही महिन्यांपूर्वीच विवाह होऊन चव्हाणांच्या कुटुंबात सून म्हणून आलेल्या वेणुताईंना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याबरोबर कासेगांवकर वैद्यांच्या पत्नी व काशीनाथ देशमुखांच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. खरेतर त्या तिघीही गृहिणी होत्या. चळवळीशी त्यांचा काहीच संबंध नव्हता पण केवळ क्रांतिकारकांवर दडपण आणण्यासाठी व त्यांनी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन व्हावं यासाठीच ही अटक केली होती. यशवंतराव चव्हाण तेव्हा पुण्यात टिळक रोडवरील भागवत बोर्डिंगमध्ये गुप्तपणे राहत होते. त्यांच्यासोबत शांताराम इनामदारही होते. कोणीतरी यशवंतरावांना सांगितले की, देशमुख नावाचे एक पोलिस अधिकारी क्रांतिकारकांच्या स्त्रियांनाही त्रास देतात. देशमुख पुण्यात रास्तापेठ भागात राहात होते. यशवंतरावांनी या देशमुखाला धडा शिकवायचे ठरविले. त्यांचा मित्र दयार्णव कोपर्डेकरला त्यांनी देशमुखांचा नेमका पत्ता मिळवायला सांगितला. त्याप्रमाणे दयार्णवने पत्ता मिळविला. दुस-या दिवशी पहाटे शांतारामला सोबत घेऊन यशवंतराव रास्ता पेठेकडे निघाले.

देशमुखांच्या घराजवळ आल्यावर ते शांतारामला म्हणाले, ' मी या इमारतीत जाणार आहे. जगलो वाचलो तर ठीक, पण समजा माझे काही बरेवाईट झाले तर तू लगेच आपल्या ठिकाणी परत जा.'
इनामदार खाली उभे राहिले. यशवंतराव जिना चढून वर गेले. अजून पुरेसे उजाडले नसल्याने जिन्यात अंधारच होता. यशवंतरावांनी देशमुखांच्या फ्लॅटची बेल दाबली. देशमुखांनी दरवाजा उघडला. त्यांच्या डोळ्यांवर झोप होती ' काय पाहिजे ?' त्यांनी विचारले-

यशवंतराव करड्या आवाजात म्हणाले ' मी यशवंतराव चव्हाण. तुम्ही पोलिस अधिकारी देशभक्तांच्या बायकांच्या पदराला हात घालता. तुम्हालाही आयाबहिणी आहेत हे लक्षात ठेवा.' इतक्या सकाळी आणि इतक्या अनपेक्षितपणे झालेल्या शाब्दिक हल्ल्याने देशमुख चांगलेच भांबावले. घरात जाण्यासाठी वळले. त्यांनी रिव्हॉल्व्हर शोधायला सुरूवात केली. इतक्यात अत्यंत चपळाईने यशवंतरावांनी पुढचा दरवाजा ओढून घेतला व खाली धूम ठोकली. ' देशमुखांशी भांडण केलेत की काय ?' शांतारामने विचारले. ' नाही. फक्त शंख फुंकून आलो. त्याचा नक्कीच परिणाम होईल.' यशवंतराव म्हणाले एका पोलिस अधिका-याला त्याच्या घरी जाऊन दम देण्यासाठी लागणारे धैर्य व धाडस यशवंतरावांच्याकडे होते.