कथारुप यशवंतराव- मिसेस साळवेंना त्रास नको !

मिसेस साळवेंना त्रास नको  !

सन १९८० च्या सुमाराची गोष्ट. यशवंतराव तेव्हा दिल्लीत होते, पण सत्तेत नव्हते. एक सामान्य खासदार म्हणून ते वावरत होते. उगवत्या सूर्याला अर्घ्य देणारी जनरीत अनुभवीत होते. एकदा एन. के. पी. साळवे यांनी आपल्या दिल्लीतील घरी पं. जसराज यांची मैफल आयोजित केली होती. गाणे ऐकण्यासाठी त्यांनी यशवंतरावांना आग्रहाने बोलावले होते. यशवंतराव आले. त्यांची प्रकृती बरी नव्हती. ते म्हणाले, ' मी तासभर गाणे ऐकेन व जाईन. ' पण नंतर पं. जसराज यांचे गायन ऐकण्यात ते तल्लीन झाले. शेवटी पंडितजींनी दरबारी कानडा गायल्यावर यशवंतराव जायला उठले, तेव्हा दोन तास उलटून गेले होते. यशवंतराव साळवेंना म्हणाले, ' गाण्यातून उठण्याची माझी इच्छा नाही, पण मला आता भूक लागली आहे. जेवण करून मला औषधं घ्यायची आहेत. मी आता निघतो.' साळवे म्हणाले, ' साहेब, तुम्ही मला हुकुम का नाही केलात ? आत्तापर्यंत जेवण तयार झाले असते.'

यशवंतराव हसून म्हणाले, ' तुम्हाला हुकूम दिला असता की मला जेवण आणा, तर तुम्ही लगेच मिसेस साळवेंना स्वयंपाक करण्याचा हुकूम दिला असता. म्हणजे त्रास मिसेस साळवेंना झाला असता. ते मला करायचं नाही.'

स्वत:ला कितीही त्रास झाला तरी कधी कोणाला बोलायचे नाही, हा यशवंतरावांचा स्वभाव होता. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची ते नेहमीच काळजी घेत असत.