कथारुप यशवंतराव- ' मेड फॉर इच अदर '

' मेड फॉर इच अदर '

यशवंतराव चव्हाण आणि सौ. वेणूताई हे एकमेकांशी पूर्णपणे समरस झालेले दांपत्य होते. १९४५ साली वेणूताईंना क्षयाची बाधा झाली. त्यांना मिरजेच्या दवाखान्यात दाखल केलेले होते. पुढे १९४६ साली  मिरजच्या दवाखान्यातून डिस्चार्ज घेताना एका उदास दुपारी वेणूताईंनी यशवंतरावांना जेव्हा सांगितले की, त्यांना आता मूल होऊ शकणार नाही आणि तुम्ही दुसरे लग्न करायला माझी हरकत नाही. तेव्हा ते फक्त एवढेच म्हणाले, ' इथून पुढे तुला मी आणि मला तू. हा विषय इथेच संपला.'

यशवंतराव असं फक्त म्हणाले नाहीत तर आयुष्यभर त्यांनी हा शब्द पाळला  !

सत्तरीच्या दशकात ' मेड फॉर इच अदर ' अशी घोषणा असलेली एक जाहिरात देशभर गाजत होती. यशवंतराव तेव्हा केंद्रीय मंत्री होते. एकदा विनायकदादा पाटील गप्पांच्या ओघात त्या जाहिरातीचा संदर्भ देऊन त्यांना म्हणाले, ' तुम्ही आणि सौ. वेणूताई ' मेड फॉर इच आदर ' वाटला.' यशवंतराव मनापासून सुखावले आणि म्हणाले ,' खरंय ते, मी माझाच एक अनुभव सांगतो. मी गृहमंत्री असताना एकदा संसदेत प्रश्नोत्तरांचा तास सुरू होता. तेव्हाच बातमी आली की क-हाडमध्ये जातीय दंगल उसळली आहे. या बातमीने मी अस्वस्थ झालो. प्रश्नोत्तरांचा तास संपल्यानंतर थेट घरी आलो आणि वेणूताईंना विचारले, ' बातमी ऐकली का ?'

तेव्हा त्या म्हणाल्या, ' हो, बातमी ऐकली आणि तुमची बॅग भरून तयार आहे.' मी लगेच कराडला जाणार हे ओळखून तिने त्यासाठी सर्व व्यवस्था अगोदरच करून ठेवली होती. आम्हाला काय म्हणायचं आहे हे न बोलताच आम्हाला समजत असे. खरंच विनायकराव , We are made for each other .'