कथारुप यशवंतराव- गप्पा मारायला येऊ का ?

गप्पा मारायला येऊ का ?

यशवंतराव दिल्लीला राहत होते, तेव्हाची गोष्ट. महाराष्ट्रातून अक्षरश: शेकडो लोक दिल्लीला त्यांना भेटायला जायचे. कामाच्या निमित्ताने दिल्लीला गेलेला मराठी माणूस आवर्जून त्यांना भेटायला जायचा. नियमितपणे यशवंतरावांना भेटायला जाणा-या व्यक्तीपैकी एक होते गं. नि. जोगळेकर.

असेच एकदा जोगळेकर दिल्लीला यशवंतरावांकडे गेले. त्यांना न्यायला यशवंतरावांनी विमानतळावर गाडी घेऊन माणूस पाठविला होता. त्यांना राहण्यासाठी एक खोली स्वच्छ करून ठेवली होती. जोगळेकर आपल्या खोलीत शिरल्यावर यशवंतराव आणि वेणूताई दोघेही त्या खोलीत आले. त्यांनी जोगळेकरांच्या चहा कॉफीच्या वेळा विचारून घेतल्या. जेवणाच्या वेळा आणि पथ्ये विचारून घेतली. त्यांना कांदा व लसूण चालत नाही हे कळल्यावर, त्या काळापुरती स्वयंपाकघरातून कांदा व लसणाची हकालपट्टी झाली. यशवंतरावांच्या घरी गेलेल्या पाहुण्याची इतकी सुंदर व्यवस्था व्हायची, की पाहुणा त्या आतिथ्याने भारावून जायचा.

एके दिवशी दुपारी जोगळेकर त्यांच्या खोलीत काहीतरी वाचत बसले होते. इतक्यात यशवंतरावांचा गंगा नावाचा एक नोकर आत येऊन नम्रपणे त्यांना म्हणाला, ' साहेब विचारत आहेत, की मोकळे असलात तर गप्पा मारायला येऊ का ?' या प्रश्नाने जोगळेकर चकीत झाले. भारताचे गृहमंत्री , नवमहाराष्ट्राचे शिल्पकार त्यांच्या घरी राहणा-या एका साध्या पाहुण्याला विचारीत होते, ' तुम्हाला वेळ असेल तर गप्पा मारायला येऊ का ?'

मूर्तीमंत सुसंस्कृतपणा, अंतर्बाह्य सौजन्यशीलता यापेक्षा वेगळी काय असते ? जोगळेकर लाजून यशवंतरावांना म्हणाले, ' साहेब , तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापातून आमच्यासाठी वेळ काढताय हेच आमचं भाग्य  ! आमचं कसलं आलंय काम ?' यावर यशवंतराव म्हणाले ,' अरे, तसे नव्हे, आपण एकमेकांची प्रायव्हसी जपली पाहिजे.'