आपण कधी बदलणार ?
यशवंतरावांकडे जातीभेद, धर्मभेद अशा संकुचित विचारांना थारा नव्हता. स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचे जुने मित्र ढवळे यांनी सांगितलेली ही आठवण.
१९४२ च्या छोडे भारत चळवळीचा प्रसार करण्यासाठी यशवंतराव कराड तालुक्यातील अनेक गावात जात असत. कॉंग्रेसची व गांधीजींची भूमिका समजावून देत असत व पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करीत असत. एकदा उंडाळे परिसरातील एका गावात संध्याकाळच्या वेळी अशीच बैठक सुरू होती. अनेक गावकरी सभेला उपस्थित होते. जो तो काही ना काही सूचना करीत होता. त्या गावातला लष्करात सेवा करणारा एक मागासवर्गीय जवानही त्या सभेला उपस्थित होता. आंदोलनाबद्दल त्याचे मत मांडण्यासाठी जेव्हा तो उठला तेव्हा गावचा पाटील त्याला म्हणाला, ' खाली बस, तुला काय कळतंय ?' देशाचे रक्षण करणा-या एका शूर जवानाला केवळ तो दलित आहे म्हणून मिळणारी ही अपमानास्पद वागणूक पाहून यशवंतरावांना अत्यंत वाईट वाटले. त्यांच्या मनात विचार आला, ' कधीतरी बाजार करायला तालुक्याच्या गावी जाणारा हा पाटील केवळ ' पाटील ' आहे म्हणून शहाणा, आणि दुस-या महायुद्धात जगातील चार देश पाहून आलेला हा जवान ' मागासवर्गीय ' म्हणून अडाणी ?' असल्या बुरसटलेल्या कल्पना आपण केव्हा बदलणार ?'
स्वातंत्र्य मिळाल्यावर जर आपल्याला संधी मिळाली तर अस्पृश्यांचा आत्मसन्मान व सामाजिक प्रतिष्ठा वाढावी यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यशवंतरावांनी मनोमन केला.