कथारुप यशवंतराव-तुझ्या उदार अंत:करणामध्ये...!

तुझ्या उदार अंत:करणामध्ये...!

भारताचे परराष्ट्रमंत्री असताना १९७४ साली एका संस्थेच्या वार्षिक अधिवेशनासाठी यशवंतराव कौलालंपूरला गेले होते. हिल्टनमधील एका अत्यंत भव्य हॉटेलच्या चोविसाव्या मजल्यावर त्यांच्या मुक्कामाची सोय केली होती. सायंकाळच्या वेळी त्या उंच हॉटेलच्या चोविसाव्या मजल्यावरुन जगाकडे पाहताना यशवंतराव भावुक झाले. भूतकाळातील सुखदु:खांच्या आठवणींनी त्यांच्या मनात गर्दी केली. वेणूताईंच्या संगतीत काढलेले कष्टाचे, आनंदाचे क्षण त्यांना आठवले, आणि कृतज्ञतेने त्यांचे मन भरुन आले. त्या दौ-यात साहेबांनी वाचनासाठी जी पुस्तके नेली होती, त्यात एका इंग्लिश लेखकाचे आत्मचरित्र होते. त्यादिवशी रात्रीच्या निवांत वेळी साहेबांनी ते आत्मचरित्र वाचनासाठी हातात घेतले. पहिल्याच पानावरील अर्पणपत्रिका वाचली आणि साहेबांचे वाचन तिथेच थांबले. ती अर्पणपत्रिका म्हणजे एका फ्रेंच कलावंताने त्याच्या पत्नीला लिलिलेले चार ओळींचे पत्र होते. साहेबांना त्या ओळी खूप आवडल्या. आपल्याच मनातील भावना त्या लेखकाने शब्दांकित केल्या आहेत असे त्यांना वाटले. सत्तर वर्षांच्या त्या कर्तृत्ववान विचारवंताने आपल्या जीवनाची ही कहाणी कृतज्ञताबुद्धीने आपल्या पत्नीला अर्पण केली होती.

त्यानंतर काही दिवसांनी वेणूताईंना पाठविलेल्या पत्रात यशवंतरावांनी लिहिले, ' त्या चार ओळी मी तुझ्यासाठी इथे देत आहे. त्यातल्या भावना फक्त त्या लेखकाच्या नाहीत.  माझ्या, अगदी माझ्या आहेत.'

" तुझ्या संगतीची साथ ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. त्याच्या या कृपेच्या जाणिवेने माझे मन आकंठ भरलेले आहे. तुझ्या उदार अंत:करणामध्ये माझ्या या जाणिवेला जागा राहू दे, एवढे सांगण्यासाठीच हे पत्र लिहित आहे."

  त्यानंतर नऊ वर्षे निघून गेली. १ जून १९८३ ला वेणूताई साहेबांना सोडून गेल्या. ' सह्याद्री ' ची सावली हरपली. त्यांच्या जाण्याने साहेब पुरते खचले. आपल्या जीवनाची कहाणी लिहावी असे त्यांना वाटले. पहिला भाग लिहून झाला. ' कृष्णाकाठ ' या आत्मकथनाची अर्पणपत्रिका त्यांनी अशी लिहिली. ' आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी पत्नी सौ. वेणूताई हिच्या स्मृतीस.' दु:ख हेच होते की, ही अर्पणपत्रिका वाचायला वेणूताई या जगात नव्हत्या.