कथारुप यशवंतराव-कुठं आहेत तुझी हरणं ?

कुठं आहेत तुझी हरणं ?

वृक्षमित्र कै. धों. म. मोहिते यांच्याबद्दल यशवंतरावांना विशेष आपुलकी वाटत असे. यशवंतरावांचे आजोळ देवराष्ट्रे ; आणि मोहिते यांचे वडगाव ही दोन गावे सख्ख्या भावंडांसारखी, एकमेकांना खेटून वसलेली आहेत. यशवंतरावांनी आपल्या बालपणातील बराचसा काळ त्या परिसरात व्यतीत केलेला असल्यामुळे त्या भागातील मातीविषयी आणि माणसांविषयी त्यांच्या अंतर्यामी एक प्रकारचा जिव्हाळा होता.

धों. म. मोहिते यांनी राजकारणापेक्षा पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले आणि अथक परिश्रम करून सांगली जिल्ह्यात सागरेश्वर अभयारण्य निर्माण केले. या अभयारण्याच्या प्रगतीविषयीची माहिती ते वेळोवेळी पत्राद्वारे यशवंतरावांना कळवीत असत. एका पत्रात त्यांनी यशवंतरावांना लिहिले की ' सागरेश्वर अभयारण्यात आता हरणांचा कळपसुद्धा बागडतोय आणि तो पाहण्यासाठी आपण एकदा अभयारण्यास अवश्य भेट द्यावी. ' योगायोगाने त्यानंतर काही दिवसांनी यशवंतराव सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर गेले. यावेळी त्यांनी सागरेश्वर अभयारण्यास भेट द्यायचे ठरवले. मोहितेंना खूप आनंद झाला. त्यांनी यशवंतरावांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठरवला. मोहितेंच्या पत्रातील हरणांच्या कळपाविषयीचा उल्लेख यशवंतरावांच्या चांगलाच लक्षात होता. अभयारण्यात आल्याबरोबर ते मोहितेंना म्हणाले, ' अरे धोंडिराम, कुठं आहेत तुझी ती हरणं ? मला तर ती कुठंच दिसत नाहीत. खरंच हरणं आहेत की नुसतीच हरणं दाखवतोयस ?'

ग्रामीण भागात ' हरणं दाखवणे ' हा वाक्यप्रचार खोटी आशा दाखवणे या अर्थाने वापरतात. या वाक्यप्रयोगाचा चपखल उपयोग करून यशवंतरावांनी आपल्या भाषाप्रभुत्वाची प्रचितीच घडवली. उपस्थित कार्यकर्ते हास्यकल्लोळात बुडाले.