यांचं अन्न खाल्लंय, विसरणार कसे ?
यशवंतरावांचे जवळचे मित्र पत्रकार रामभाऊ जोशी यांनी सांगितलेली ही आठवण. यशवंतराव तेव्हा केंद्रात मंत्री होते. त्यांचा कोल्हापूर दौरा चालू होता. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर रात्री विश्रामगृहात मुक्काम करून, सकाळी सहा वाजता विमानाने मुंबईला जायचे आणि तेथून दिल्लीस प्रयाण करायचे असे दौ-याचे नियोजन होते. या दौ-यात रामभाऊ त्यांच्या बरोबर होते. सकाळी सहाच्या विमानाने जायचे असल्याने यशवंतरावांचे स्वीय सहाय्यक डोंगरे व रामभाऊ यांची उजाडल्याबरोबर लगबग सुरू झाली. यशवंतराव सव्वापाच वाजता तयार होऊन बाहेर आले. सामान मोटारीत गेले. सर्वजण व्हरांड्यात आले. गाडी पोर्चमध्ये उभी होती. व्हरांड्या्च्या पाय-या उतरत असताना मोटारीच्या पलिकडे झाडाखाली दोन खेडून उभे असल्याचे यशवंतरावांना दिसले. खांद्यावर घोंगडे असलेली माणसे पाहून यशवंतराव थबकले. त्यांनी त्या दोघांना क्षणभर निरखून पाहिले, आणि मग त्यांना नावानिशी हाक मारली. हाक ऐकताच दोघेही समोर आले. नमस्कार केला. ' अरे, इतक्या सकाळी तुम्ही इथे कसे ?' यशवंतरावांनी विचारले.' या, आत या ' म्हणत त्यांच्यासह ते आत येऊन बसले. दोघांच्याही कुटुंबाची चौकशी केली. ' मुलं काय करतात ?' यशवंतरावांनी विचारले. ' त्यासाठीच तर आलोय ' एकजण म्हणाला. ' आमची दोघांची मुलं सात बुकं शिकलीत. शेतात कामाला जायला टाळत्यात. त्यास्नी कुठंतरी चिकटवा म्हणून सांगायला आलोय. पोरं हिंडत राहिली तर जगायचं कसं ?'
यशवंतरावांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि मग ते डोंगरेंना म्हणाले, ' या दोघांचे नाव - पत्ते आणि त्यांच्या मुलांची नावे लिहून घ्या. त्या दोघांना ' काय करता येईल ते पाहतो ' असं म्हणून यशवंतराव जाण्यासाठी उठले. मोटारीत बसल्यावर रामभाऊ जोशी साहेबांना म्हणाले, ' कोण कुठले ते खेडूत, पण त्या दोघांची, त्यांच्या बायकामुलांची नावे घेऊन तुम्ही चौकशी केली, हे कसे काय ?' साहेब हसले. म्हणाले, ' त्याचं काय आहे , भूमिगत असताना आम्ही द-याखो-यात , शेतातील पिकांत लपून रहात होतो. ज्यांच्या शेतात आमचा ठिय्या असायचा तो शेतकरी आमचा मित्र बनायचा. कुठं लपून रहायचं याची माहिती तो देत असे. त्याची बायको घरातून भाकरी आणून गुपचूप द्यायची. या शेतकरी मित्राला काही चाहूल लागली तर आम्हाला निघून जाण्याचा इशारा मिळायचा. अहो, आम्ही यांचं अन्न खाल्लयं, यांना विसरणार कसे ?'
त्यानंतर दोन - तीन महिने असेच निघून गेले. एकदा रामभाऊंनी डोंगरेंना ( साहेबांचे निजी सचिव ) सहज विचारले, ' साहेबांनी कोल्हापूरच्या मुक्कामात भल्या सकाळी त्या दोन शेतक-यांना दिलेल्या आश्वासनाचे काय झाले ?' डोंगरे म्हणाले, ' ती दोन्ही तरुण मुले तगडी आणि उंचीपुरी असल्याने पोलीसात भरती झाली आहेत.' असे होते यशवंतराव... ! केलेली मदत न विसरणारे ! दिलेला शब्द न बदलणारे ! !