पुढे १२ मार्चला गांधींचा दांडी-मोर्चा अहमदाबादहून सुरू झाला. साबरमतीच्या आश्रमातून ते मजल, दर मजल करत दांडीच्या दिशेने वाटचाल करू लागले. आणि मी एक आश्चर्य पाहिले, की जसजसे त्यांचे एक एक पाऊल पुढे पडत होते, तसतसा देश जागा होऊन काही करू इच्छीत होता. जी माणसे मला तटस्थ आणि विरोधी वाटली होती, त्यांच्यांतही मला फरक जाणवू लागला. कराडला जाहीर सभा होऊ लागल्या. त्या सभांमध्ये यांतील काही मंडळी येऊ लागली. खेड्यापाड्यांतूनही मंडळी आवर्जून भाग घेऊ लागली. शांत, एकाकी, अविचल व स्थिर असा एखादा पाण्याचा डोह असावा आणि अचानक कुठून तरी वादळी, सोसाट्याचा वारा यावा, म्हणजे त्यावरती जसे लाटांचे तरंग उठू लागतात, तसेच शांत पहुडलेल्या या समाजाचे होऊ लागले. माझ्या डोळ्यांसमोर हे चित्र आजही येते. थोड्या दिवसांच्या अंतरामध्ये समाज कसा बदलल्यासारखा वाटू लागला. महात्मा गांधींना देशातल्या ग्रामीण व शहरी समाजाची नाडी समजलेली होती, म्हणून त्यांनी दांडी-मोर्च्याची कल्पना काढली होती. त्यांच्या या निर्णयाची एक प्रकारे कसोटीच लागली.
शेवटी सरकारला गांधीजींना पकडावे लागले. आणि या अटकेमुळे जो एक नवा प्रभाव जनतेवर पडला, त्याचे रूप अवर्णनीय आहे. गांधीजींनी सुरू केलेला मिठाचा सत्याग्रह हा आता त्यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नव्हता. देशातल्या चहूबाजूला संधी सापडेल तेथे मीठ व जंगल-सत्याग्रह होऊ लागले. लोकांच्या धरपकडी सुरू झाल्या. ब्रिटिश सरकारच्या निषेधाच्या सभा आणि त्यांतून होणारी भाषणे यांतून जनजागृती होऊ लागली. मोठा रामहर्षक काळ होता तो !
आमच्या कराडला तर जवळ जवळ दररोज कृष्णेच्या घाटावर सभा होत असे. आणि त्या सभांतील भाषणे ऐकण्याकरता मी तासन् तास तेथे घालवत असे. कराड शहरातील काही वकील मंडळी फार उत्तम भाषणे करत. बाहेरचीही विद्वान माणसे येत होती. त्यांचीही व्याख्याने होत. त्यामुळे एक प्रकारचे लोकशिक्षण होत असे. आम्हां विद्यार्थ्यांवर या सभांचा परिणाम होत असे. लहानशा सभांतून मीही बोलू लागलो होतो.
माझ्या वर्गात अहमद कच्छी म्हणून एक अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होता. त्यांचे कुटुंब आगाखान पंथातील होते. व्यापाराखेरीज काही बाहेर पाहू नये, अशी त्यांच्या घरातील कर्त्या माणसांची वृत्ती होती, पण हा मुलगा अतिशय बुद्धिमान असल्यामुळे त्याला भोवतालच्या परिस्थितीचे स्वरूप समजून घेण्याची अधिक उत्सुकता असे. जाहीर सभांना जाण्याची त्याला त्याच्या घरातून परवानगी नसे; पण मी त्याला रोज काय घडले, त्याची माहिती सांगत असे. तो माझा मोठा मित्र बनला. आणि त्याच्यावरचे भीतीचे जे दडपण होते, ते कमी करण्याचा मी प्रयत्न केला. तो अतिशय सुसंस्कृत मुलगा होता. त्याचा इंग्लिश विषय तर इतका उत्तम असे, की जणू काही तो इंग्रज कुटुंबातच वाढला आहे, असे वाटावे. मला आठवते, की एकदा मासिक परीक्षेच्या वेळी आमच्या इंग्रजीच्या शिक्षकांनी त्याला २५ मार्कांच्या पेपरला २६ मार्क देऊन त्याचा गौरव केला होता ! मी त्याच्याशी ज्या चर्चा करीत असे, त्यांतून मुसलमानांच्या तटस्थपणाचे चित्र मी थोडे-फार समजू शकलो.
उथळे म्हणून महार समाजातील माझे एक मित्र होते. तेही आमच्या बरोबर असत. आमच्यासारखे बोलत. पण या कामासाठी ते कधी आम्हांला त्यांच्या समाजात घेऊन जात नसत. मी त्यांना एकदा विचारले,
''असे का ?''
त्यांनी सांगितले,
''आमच्या समाजाची दुःखे, तुम्ही समजता, त्याच्यापेक्षा वेगळी आहेत. महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकरांना का बरोबर घेत नाहीत? ते जर त्यांनी केले, तर ही गोष्ट बदलून जाईल.''