कृष्णाकांठ३९

या एका दिवसाने व घटनेने आमच्या गावच्या परिस्थितीत आणि माझ्या चित्तवृत्तींत खूपच फरक पडला. त्याच्या आधी भाऊसाहेब बटाणे यांनाही अटक करून नेण्यात आले होते. त्यामुळे आमच्या गावी चळवळीला उधाण आले होते, असे म्हटले, तरी चालेल.

आता चळवळ खेड्यापर्यंत पोचली होती. आम्हांला खेड्यांतून भाषणे करण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली. मी आणि इतर काही कार्यकर्ते या सभांसाठी जात असू. एखाद्या गावी गेल्यानंतर काँग्रेसची सभा होणार, असे जाहीर करत. मुले गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जात. मग कुठे एखाद्या मंदिरामध्ये किंवा गावातल्या प्रमुख ठिकाणी असणा-या पाराच्या सावलीत आम्ही सभा घेत असू. दीडदोनशेपर्यंत माणसे जमत. लांब उभ्या राहून स्त्रियाही भाषणे ऐकत असत. आम्ही आमच्या शक्तीप्रमाणे चळवळीची माहिती श्रोत्यांना देत असू. गांधींनी केलेल्या कार्यांची हकीकत सांगत असू. सरकारने केलेल्या अत्याचाराची माहिती देत असू. आपला देश इंग्रज सरकार पिळून काढीत आहे आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये अज्ञान व दारिद्य्र वाढते आहे, असे सरळ साधे, सोपे विषय मांडत असू. राष्ट्रप्रेमाचा संदेश शेवटच्या थरापर्यंत पोहोचला असल्यामुळे माणसे आमची ती भाषणे मोठ्या प्रेमाने ऐकून घेत. आम्ही त्यांना सांगत असू, की 'आपण सर्व काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊ या, म्हणजे आपण स्वतंत्र होऊ.'

एका गावची मला आठवण आहे. तेथे आमची सभा झाल्यानंतर एक जाणता व वयस्कर मनुष्य उभा राहिला आणि म्हणाला,

''पोरांनो, तुम्ही चांगले काम करता आहात, हे खरे; पण या निव्वळ गांधी टोप्या घालून आणि झेंडे फिरवून स्वराज्य कसे मिळणार, रे ! इंग्रज मोठा बलिष्ठ राजा आहे. तो तुमच्या बोलण्याने कसा हटणार ? त्याच्यासाठी लढले पाहिजे व तलवारीची लढाई केली पाहिजेल.''

अशा अर्थाचे बोलल्यानंतर आम्ही त्याला आमच्या समजुतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण त्यामुळे लोकांच्या मनात काय विचार येतात, याची आम्हांला थोडी-फार कल्पना आली. स्वराज्य मिळविण्याचा विचार लोकांना पटलेला होता. पण आम्ही म्हणतो, त्या अहिंसक पद्धतीने ते मिळणार का, हा लोकांच्या मनातला प्रश्न अनेकांच्या मनांत व अनेक स्तरांवरच्या माणसांत निर्माण होत होता. वर्तमानपत्रांतसुद्धा चळवळीबद्दल जे लिहिले जात होते, त्यामध्ये हा विचार अनेक मंडळींनी प्रत्यक्ष मांडण्याचाही प्रयत्न केला होता. शहाणीसुरती विद्वान माणसेही 'रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?' अशा शब्दांत हाच प्रश्न निराळया पद्धतीने मांडत होती.

हरिभाऊ जेलमध्ये गेल्यामुळे मी आणि माझे साथी यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली होती. परंतु स्वस्थ बसायचे नाही, हा आमचा निर्णय होता. पोलिसांचे माझ्याकडे लक्ष गेले होते. आणि माझ्या बंधूंजवळ पोलिस इन्स्पेक्टरने तसा काहीसा उल्लेख केला होता. माझी आणि गणपतरावांची यावर चर्चा झाली. तेव्हा मी त्यांना सांगितले,
''मी माझे काम बंद करणार नाही; परंतु मिठाची पुडी घेऊन मुद्दामहून तुरूंगात जाण्यासारखेही काही करणार नाही. मात्र दररोज सकाळी प्रभात-फेरी काढून कराड शहरात व संध्याकाळी शाळा संपल्यानंतर आसपासच्या खेड्यांत जाण्याचा माझा लोकशिक्षणाचा कार्यक्रम मी काही बंद करणार नाही.''

गणपतरावांना ही चळवळ महत्त्वाची आहे, हे पटत होते आणि म्हणून त्यांनी मला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु मला सांगितले,

''तू हे करतो आहेस, हे आईला पसंत आहे काय? हे तिच्याशी तू बोलून घे.''

मी तर या चळवळीसंबंधाने माझ्या आईशी दररोजच बोलत होतो.