माधवरावांना माझी सूचना पटली आणि आम्ही दोघे कोल्हापूरला त्या वेळच्या मोटर सर्व्हिसने गेलो. कोल्हापूरला पोहोचायला तीन तास लागत असत. दुपारनंतर आम्ही निघालो. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी कोल्हापूरला पोचलो. कोल्हापूरची काहीच माहिती नव्हती. विचारीत विचारीत पॅलेस थिएटरकडे गेलो. तिकीट-विक्री सुरू होती. दोन तिकीटे घेतली. शेजारच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा, भजी खाल्ली आणि थिएटरमध्ये जाऊन आपल्या जागी बसलो. आम्ही एवढ्या लांबून कोल्हापूरला 'प्रेमसंन्यास' पाहायला आलो होतो. पण कोल्हापूरकरांना 'प्रेमसंन्यास' पाहण्याची फारशी आवड दिसली नाही. कारण अर्धे अधिक थिएटर मोकळेच होते. नाही म्हटले, तरी अशा गोष्टींचा मनावर परिणाम राहतो. नाटक सुरू झाले. आणि जयंताच्या भूमिकेत मी केशवराव दात्यांना पाहिले. त्यांचा अभिनय, शब्द उच्चारण्याची पद्धत मला फार आकर्षक वाटली. ज्यासाठी मी आलो होता, त्याचे चीज झाल्यामुळे मला समाधान झाले.
रात्री दीड-दोनच्या सुमारास नाटक संपले.
आता पुढे काय करायचे, असा आमच्यापुढे प्रश्न होता. तेव्हा पॅलेस थिएटरपासून चालत आम्ही रेल्वे स्टेशनपर्यंत गेलो. रेल्वे स्टेशनवर तेव्हा कराडला जाणारी कुठलीच गाडी नव्हती. पॅसेंजर वगैरेही तेथे कोणी नव्हते. सर्व एकदम शांत शांत होते. पांघरायला गरम असे काही नेले नव्हते. फक्त अंगावरचे कपडे होते. निदान स्टेशनच्या भिंतीचा आडोसा तरी होता. पण आमची पंचाईत केली रेल्वेच्या पोलिसाने ! त्याने चौकशी सुरू केली,
''गाडी नसताना तुम्ही स्टेशनमध्ये काय करीत आहात?''
कदाचित त्याचे बरोबरही असेल. तो आपले काम करीत असेल, पण आमची गैरसोय होऊ लागली. आम्ही त्याला सर्व खरे सांगितले.
''आम्हांला सकाळपर्यंत वेळ काढावयाचा आहे. सकाळच्या गाडीने आम्हांला कराडला परत जायचे आहे.''
''निव्वळ नाटक पाहण्यासाठी तुम्ही इतके दूर आलात का?'' त्याने विचारले.
आम्ही हो म्हटले.
मला वाटते, पोलिसांतही काही काही चांगली माणसे असतात. कदाचित तोही नाटकाचा शौकीन असावा.
''तुम्ही खुशाल बाकावर झोपा. तुम्हांला कोणी त्रास देणार नाही.'' असे त्याने सांगितले.
अशा रीतीने उरलेली रात्र मंद प्रकाशात, थंडीने कुडकुडत का होईना, त्या स्टेशनवर, बाकड्यांवर अंग टाकून काढली. दुस-या दिवशी सकाळच्या गाडीने कराडला परत आलो.
विद्यार्थिदशेतले आमचे हे प्रयोग माझ्या घरातील सर्व मंडळींना पसंत होते, असे नाही. पण झालेली हकीकत मी त्यांना खरी सांगे.