कृष्णाकांठ३१

कराडला एकदा 'बालमोहन नाटक मंडळी' ही लहान मुलांची नाटक कंपनी आली होती. त्यांची ती सुरेख पात्रे पाहून आम्हांला वाटले, की त्यांच्या-इतकेच लहान होऊन या नाटक कंपनीत सामील व्हावे .

घाटगे मास्तर आणि मी अखेरपर्यंत नाटकांचे शौकीन राहिलो.

हे सर्व छन्द, हे सर्व उद्योग चालू असतानादेखील माझ्या विचारातून मनात निर्माण झालेली राष्ट्रप्रेमाची मूळ ऊर्मी हीच मला टिकाऊ वृत्ती दिसली आणि बाकीचे सर्व हे छन्द ठरले.
मी आता सोळा वर्षांचा झालो होतो. १९२९ साल संपत आले होते. देशामध्ये राष्ट्रीय चळवळीने आक्रमक स्वरूप घेतले होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. वसाहतीचे स्वराज्य, की संपूर्ण स्वराज्य, याचा निर्णय या अधिवेशनात लागणार होता. यामुळे या अधिवेशनाकडे माझे आणि माझ्या सर्व मित्रगणांचे लक्ष लागले होते. हरिभाऊ लाडांच्या व्यापारी छापखान्यात आमच्या मित्रांची टोळी जमे. आणि या सर्व गोष्टींचा ऊहापोह आम्ही तेथे करीत असू. आता काही महत्त्वाची वृत्तपत्रे व्यवस्थित येऊ लागली होती. व्यापारी प्रेस आता आमच्या बैठकीचा अड्डा झाला होता. हरिभाऊंना माणसांची आवड होती. आम्ही त्यांच्याकडे बैठकीसाठी जमत असू, हे त्यांना आवडत असे. तेथे आम्हांला घरच्यासारखेच वाटत असे.

तेथे झालेल्या या सर्व चर्चांतून आम्ही असा विचार केला, की या घडामोडींतून देशात काही तरी चांगले व नवे निर्माण होणार आहे. आणि आपण सर्वांनी मिळून जे काही करता येणे शक्य असेल, ते यावेळी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय करावयाचे, या संबंधी नक्की काही ठरत नव्हते. निश्चित काही माहितीही नव्हती. पण आमच्या मनाची मात्र संपूर्ण तयारी झाली होती. आम्ही त्यावेळचे कराडचे प्रमुख व्यापारी आणि पुढारी श्री. भाऊसाहेब बटाणे यांना हरिभाऊ लाडांसह जाऊन भेटलो. आणि आमच्या मनात काय आहे, हे त्यांना सांगितले. त्यांनी ऐकून घेतले. आमच्या बरोबर त्यांचा मोठा चिरंजीव शिवाजीराव हा फार उत्साही असा मुलगा होता. भाऊसाहेब बटाण्यांनी हरिभाऊंना सांगितले,
''आपल्या शहरातील जी राष्ट्रीय काँग्रेसची मंडळी आहेत, त्यांची व या मुलांची भेट घालून द्या.''

त्याप्रमाणे त्यावेळी महाराष्ट्र प्रांतिकचे पदाधिकारी असलेले कराडचे सदाशिवराव आळतेकर यांना आम्ही भेटलो. त्यांना बरे वाटले. परंतु परिस्थिती निश्चित काय रूप घेईल, याची त्यांना फारशी कल्पना नव्हती. गांधी आणि काँग्रेसवर श्रद्धा असलेले ते गृहस्थ होते. त्यांची ही परंपरा पुढे त्यांचे पुत्र प्रसिद्ध वकील गणपतराव आळतेकर यांनी चालविली. सातारा मतदार संघातून पार्लमेंटचे सभासद म्हणूनही ते पुढे निवडले गेले होते.

लाहोरच्या रावी नदीच्या तीरावर राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले आणि तेथे झालेली काँग्रेस नेत्यांची भाषणे वृत्तपत्रांतून वाचल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहू लागले. रावीच्या तीरावर जमलेल्या या राष्ट्रभक्तांनी काही अखेरचे निर्णय घेतले होते आणि संपूर्ण स्वातंत्र्य हीच आमच्या देशाची एकमेव मागणी ठरवली होती. हे वाचून आम्हां सर्वांची मने उल्हासित झाली. त्या अधिवेशनात २६ जानेवारी १९३० रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे ठरले आणि तसे जाहीरही केले गेले.