मे महिन्याची संध्याकाळ होती. सुमारे पाच वाजले असावेत. सभा कृष्णाघाटावर होती. हजारो माणसे उन्हाने तापलेल्या घाटावर बसली होती. उन्हाने तापलेला कातळ त्यावर बसणा-या माणसाला भासेल इतका गरम होता. शास्त्रीबुवा बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी पहिले वाक्य उच्चारले, ते असे :
''तुम्ही बसला आहात, तो घाट जसा गरम झाला आहे, तशी तुमची बुद्धी व मने गरम झाली पाहिजेत. देशाची तुमच्याकडे आज ही मागणी आहे.''
चेह-यावर बुद्धिमत्तेचे तेज असलेल्या तरुण शास्त्र्याचे हे एकच वाक्य सभा जिंकून गेले.
त्यानंतर त्यांची आठ-दहा भाषणे झाली.
या दोघांची भाषणे माझ्या लक्षात राहण्याचे आणखी दुसरे एक कारण आहे. या दोघांच्या भाषणांबद्दल कराड पोलिसांनी दोघांच्यावर खटले भरले. दोन्ही खटल्यांमध्ये काही महिन्यांचे अंतर असेल. पण या खटल्यांमुळेही लोकजागृती होण्यामध्ये आणखी भरच पडली. या दोन्ही खटल्यांच्या वेळी मी मॅजिस्ट्रेट कचेरीमध्ये हजर राहून या खटल्याची संपूर्ण हकीकत व कामकाज ऐकले व पाहिले आहे; सरकारी रिपोर्टरने त्यांच्या भाषणांतील त्यांना वाटणा-या आक्षेपार्ह मजकुरांची साक्ष द्यायची. आणि ह्या वक्त्यांनी आपण हे बोललो आहोत आणि बचावाच्या कामात आपल्याला भाग घ्यायचा नाही, असे ठामपणे निवेदन करायचे. हाच परिपाठ पडला होता. माझ्या आठवणीप्रमाणे दोघांना सहा सहा महिन्यांच्या सक्तमजुरीच्या शिक्षा झाल्या. तरीसुद्धा दोघेही हसतमुख होते. ते लोकांना नमस्कार करत आपल्या कोठडीत शिरल्याचे मी पाहिले आहे.
स्वातंत्र्याच्या लढ्याची ही प्रात्यक्षिके पाहत एक प्रकारचे लोकशिक्षण होत होते, असे म्हटले पाहिजे. शेकडो लोक हे खटले पाहायला आणि ऐकायला जमत असत. मग त्यावर लोकांची चर्चा चालू होई. पुन्हा त्या शिक्षेच्या नंतर निषेधार्थ जाहीर सभा होई, असे हे न संपणारे वर्तुळ होते.
एके दिवशी आमच्या कराडमध्ये सत्याग्रहाचा दिवस उगवला. असे जाहीर झाले, की शिरोड्याहून बेकायदेशीररीत्या मीठ तयार करून त्याच्या विक्रीसाठी कोणी प्रमुख मंडळी येणार आहेत. आम्ही त्यांच्या स्वागताची आणि सभेची व्यवस्था केली. ते लोक कोण आहेत. कुठले राहणारे आहेत, याची कल्पना आम्ही कुणाला येऊ दिली नाही. बटाणे मंदिराच्या चौकात जेथे तीन रस्ते एकत्र मिळतात, तेथे संध्याकाळी सभेसाठी प्रचंड गर्दी जमा झाली आणि आता पुढे काय होणार, याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहू लागले. पोलिस बंदोबस्त कडेकोट होता. आमच्या भागातील पोलिस इन्स्पेक्टर आपल्या युनिफॉम व फौजफाट्यासह सज्ज होते. आता ही लढाई कशी जुंपते, याची लोक वाट पाहत होते, मिठाची विक्री करणारे कोल्हापूरचे श्री. निकम अनपेक्षितपणे व चपळतेने सभेच्या एका कोप-यातून येऊन व्यासपीठावर उभे राहिले आणि त्यांनी आवाहन केले,
''गांधीजींच्या आज्ञेप्रमाणे आम्ही बनविलेल्या मिठाच्या पुड्या माझ्याजवळ आहेत आणि मी त्यांची विक्री करणार आहे. जे कोणी घ्यायला तयार असतील, त्यांनी पुढे यावे.''
हातामध्ये मिठाच्या पुड्या घेऊन, तो हात उभारून ते लोकांना सांगत होते.
''बोला, बोला !''