चाललेल्या या सर्व घडामोडी आम्ही मोठ्या आवडीने वाचत होतो आणि त्यांबद्दल चर्चा करत होतो. २६ जानेवारी जसा जवळ येऊ लागला, तसा त्यात कसा भाग घ्यायचा, याची चर्चा सुरू झाली. मग आमचे असे ठरले, की त्या दिवशी आपणही एक प्रतिज्ञापत्रक तयार करून वाचावे. हे प्रतिज्ञापत्रक तयार करण्याचे काम माझ्यावर सोपविण्यात आले. मी त्याप्रमाणे ते तयार केले. भावनाप्रधान अशा पाच-पंचवीस वाक्यांत ते प्रतिज्ञापत्रक होते. भाषेवर गडकऱ्यांच्या शैलीचा परिणाम होता. मी अलीकडेच खूप प्रयत्न केला; पण मला त्याची जुनी प्रत सापडू शकली नाही. माझ्या मित्रांनी त्या प्रतिज्ञापत्रकाचे स्वागत केले. ते छापून घेऊन प्रसिद्ध करावयाचे होते व वाटावयाचे होते, म्हणून दिनांक २५ लाच रात्री व्यापारी छापखान्यामध्ये आम्ही सर्वजण जमलो आणि ते प्रतिज्ञापत्रक छापून घेतले. ते छापून घेण्यास पहाटेचे चार वाजले होते. सकाळी आठ वाजता कृष्णा घाटावर झेंडावंदन होते. प्रेसमधून आम्ही आपापल्या घरी गेलो. अंघोळ करून, कपडे बदलून, पुन्हा प्रेसमध्ये जमलो आणि सर्वजण मिळून हरिभाऊंच्या नेतृत्वाखाली सात वाजता कृष्णेच्या घाटावर पोहोचलो. आमच्या मनात उत्साह भरून राहिला होता. झेंडावंदनासाठी आमच्याखेरीज इतरही पंचवीस-तीस माणसे जमली होती. परंतु आम्हांला त्याची पर्वा नव्हती. आम्ही प्रतिज्ञापत्रक सर्वांना वाटले. झेंडावंदन झाले, स्वातंत्र्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावयाचे, अशी मनःपूर्वक शपथ घेऊन आम्ही आपापल्या घरी परतलो.
कृष्णेच्या काठाच्या त्या २६ जानेवरीची ती सुंदर सकाळ मी कधीच विसरू शकणार नाही. मनात दाटलेली भावना आता प्रकट स्वरूपात व्यक्त झाली होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या तिरंगी झेंड्याखाली आज आपण प्रतिज्ञावाचन केल्यामुळे मनाची शांती वाढली. माझे राजकीय जीवन ख-या अर्थाने सुरू झाले.
२६ जानेवारी आणि नंतरचा काळ ब-याच उद्योगांत गेला. माझ्या राजकीय हालचाली तर चालू होत्याच, पण परीक्षा जवळ आल्यामुळे तिकडेही लक्ष देण्याची गरज होती. माझ्याभोवती शाळेतल्या विद्यार्थ्यांचे एक छानसे कोंडाळे निर्माण झाले होते. तीही सर्व तरुण मुले आपल्या अभ्यासाची तयारी चांगली करणारी होती. तशीच माझ्या कामाला सहानुभूती दाखविणारी आणि मदत करणारीही होती. आमच्या हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांचा एका अर्थांने मी 'स्पोक्समन' बनलो होतो. मी अजूनही त्यांचा पुढारी बनलो होतो, असे म्हणणार नाही. या वर्षी परीक्षा मार्चमध्ये होत्या. आणि त्याच सुमाराला महात्मा गांधींचा दांडी-मार्च सुरू होणार होता. मी राजकारण जास्त करीत होतो आणि अभ्यास कमी करीत होतो; परंतु तरीसुद्धा माझी परीक्षा मी पास झालो. त्याचे कारण माझे वाचन असल्यामुळे मराठी विषय मला तसा सोपा वाटत असे. आणि हा इतिहास विषयही मला अवघड वाटत नसे. संस्कृतमध्ये चांगले मार्क मिळावेत, या दृष्टीने प्रयत्न करीत असल्यामुळे त्यातही माझी प्रगती बरी होती, माझी खरी अडचण होती मॅथॅमेटिक्स्ची. त्यातले अंकगणित आणि भूमिती हे विषय माझे फार उत्तम असत. परंतु बीजगणितामध्ये मात्र माझी काही मात्रा चालत नसे. मला ते आवडतच नसे. त्यामुळे बीजगणिताचा पेपर असेल, तर तो अक्षरशः कोरा देणे आणि राहिलेल्या दोन विषयांमध्ये पास होण्याइतके मार्क मिळविणे, अशी आमची 'स्ट्रॅटेजी' चाललेली असे.
आमच्या शिक्षक-वर्गात दोन तऱ्हेची शिक्षक मंडळी होती. एक वर्ग असा होता, की जो मूलतःच राष्ट्रीय वृत्तीचा होता. अभ्यास चांगला करून राजकीय हालचाली करणा-या मुलांना ते एक प्रकारे उत्तेजनच देत असत. मात्र त्यांची अट अशी असे, की शाळेला काही कमीपणा व नुकसान येईल, असे काही करता कामा नये. दुसरी अट अशी असे, की शाळेतले अभ्यास चांगल्यापैकी केले पाहिजेत. आमच्या शाळेचे दोन प्रमुख शिक्षक पाठक आणि दुवेदी हे या प्रकारचे शिक्षक होते. माझा अभ्यास उत्तम करून मी चळवळी करतो, म्हणून, नाही तरी, त्यांचा माझ्यावरती लोभच होता. पण दुसरे काही शिक्षक असे होते, की त्यांना असे वाटत असे, की आम्ही नको ते उपद्व्याप करतो. या शिक्षक-मंडळींना कशातच रस नसे. आणि शिक्षक म्हणूनही ते एका अर्थाने बेताचे होते. परंतु विद्यार्थ्यांनी काही आगळे करावे, हे त्यांना रूचतच नव्हते. अशा शिक्षकांचे आणि माझे फारसे जमले नाही. पण ज्यांचे जमले, त्यांच्या उबदार आठवणी आजही माझ्या मनात येतात. पाठक, दुवेदी यांची आठवण मी कॉलेज संपवून परत आल्यानंतरही माझ्या मनात जागृत होती. शिक्षक म्हणूनही ते उत्तम होते. आणि सार्वजनिक कामाची दखल घेणारेही होते. त्यांच्याबद्दल आदराची नोंद करून ठेवणे मी माझे कर्तव्य समजतो. जे शिक्षक, भोवताली जे काही चालले आहे, त्यांसबंधी एक प्रकारची उपेक्षा वृत्ती आणि उदासीनता दाखवीत होते, त्यांना तर खरे म्हणजे कशातच रस नव्हता. त्यामुळे ते शिक्षक या नावाला पात्र तरी होते, की नाही, कोण जाणे !