कृष्णाकांठ३४

शाळेतला हा असा प्रकार, बाहेरही माझे लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी संबंध वाढत होते. मी एक पाहिले, की कराडमधील सर्व वर्गांमध्ये देशामध्ये घडत असलेल्या परिस्थितीबद्दलची एक प्रकारची उत्सुकता व कुतूहल निर्माण झाले होते. वर्तमानपत्रे जास्त वाचली जात होती. त्यामुळे सुशिक्षित समाज व्यापारी वर्ग, यांच्याबरोबरच आमच्या कराडमधल्या छोट्या जमातींचा जो समाज होता, तो म्हणजे भोई समाज, कोष्टी समाज, शिंपी समाज यांच्यामध्येही राष्ट्रीयत्वाचे वातावरण संचारले होते, असे मला दिसले. पण या वातावरणापासून काही तरुण मुले सोडली, तर बाकीचा मुसलमान समाज तटस्थ होता. अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजामध्ये एक प्रकारची उदासीनता होती. त्याची काय कारणे असावीत, हे मला माहीत नव्हते. पण मी कार्यकर्ता म्हणून जेव्हा गावातील मोहल्ल्या मोहल्ल्यांतून हिंडत असे, आणि छोट्या-मोठ्या सभांतून बोलायचा प्रयत्न करीत असे, तेव्हा ही गोष्ट मला उत्कटतेने जाणवे. मग मी आपल्या मित्रांशी चर्चा करीत असे, की हे असे का? देशातल्या सर्व थरांतील जनतेचा सामूहिक उठाव करण्याचा प्रयत्न गांधी, नेहरू करू इच्छितात. पण येथे समाजातही कोणी काहीसे तटस्थ व कोणी काहीसे विरोधी असे वातावरण का असावे, याचे स्पष्ट उत्तर कोणाजवळच नव्हते. ज्यांचा पाठिंबा आहे, त्यांचा पाठिंबा घेऊन आपण आपले काम करीत राहावे, अशी आम्हां तरुण मित्रांची वृत्ती होती. कराड गावाबाहेरच्या खेडेगावांमध्येही मी काहीसे कुतूहल निर्माण झालेले पाहिले. पण त्यांच्यामध्ये प्रत्यक्षात भाग घ्यावा किंवा काही करावे, अशी वृत्ती दिसली नाही. मी याचे कारण समजून घेण्याचा व तपासण्याचा प्रयत्न केला. आणि तो प्रयत्न म्हणजे मी माझे बंधू गणपतराव यांच्याशी केलेली चर्चा. ते लॅण्ड मॉर्गेज बँकेत काम करत होते. त्यामुळे त्यांचा खेड्यांतील कर्त्या शेतकरी मडंळींशी सतत संबंध येत होता. त्यांनी मला सांगितले,
''शेतकरी मंडळींनी तुमच्या या चळवळीत का यावे? तुम्ही शेतकरी मंडळींकडे जाऊन त्यांचे प्रश्न काय आहेत, हे कधी बोललात किंवा चर्चा केली आहे का? त्यांचे जे प्रश्न आहेत, ते सरकारी यंत्रणेशी संबंधित असतात. त्यामुळे सरकारविरोधी चळवळीत जाणे त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे ते काहीसे दूर राहतात. तुम्ही जाऊन त्यांच्याशी भेटायचा, बोलायचा प्रयत्न कराल, म्हणजे तुम्हांला समजेल.''

मी याबाबत माझ्या मित्रांशी बोललो. दोन-चार मित्रांनी सुट्टीच्या दिवशी बाहेर खेड्यांत माझ्याबरोबर येण्याचे कबूल केले. कराड शहरात मी माझ्या कामामुळे माहीत झालो होतो. पण कराड गावाच्या बाहेर खेड्यांत मला 'गणपतरावांचा भाऊ' म्हणून सांगावे लागे आणि त्या तऱ्हेनेच लोक मला ओळखत असत.

मी जेव्हां चार-सहा गावांत जाऊन तेथील काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा असे दिसून आले, की थोडे-फार शिक्षण झालेली जी तरुण मंडळी होती, त्यांना या चळवळीमध्ये जे नवीन चालले आहे, त्यात रस होता. पण आपण त्यात भाग घ्यावा, ही गोष्ट त्यांच्या गावातील पुढाऱ्यांच्या धोरणामुळे पटत नव्हती. गावच्या पुढाऱ्यांच्या जवळ जायची आमची ताकद नव्हती. कारण आम्ही तसे पोरसवदे होतो. आणि या पुढारी मंडळींचे सरकार-दरबारी हितसंबंध गुंतलेले असत. त्यांना स्वराज्याची चळवळ म्हणजे नसत्या उठाठेवी वाटत.

मी मात्र एक समजून चुकलो, की या चळवळीशी तटस्थ आणि विरोधी असणारे जे शहरातील लोक आहेत आणि खेड्यापाड्यांतून पसरलेला जो ग्रामीण समाज आहे, त्यांचे मन जागे केल्याशिवाय चळवळ वाढणे अवघड आहे.