कृष्णाकांठ३८

लोक एकमेकांकडे कुतूहलाने आणि उत्कंठेने पाहत होते. आता हे धाडस कोण करणार, याबद्दल औत्सुक्य होते. लोकांमध्ये एक प्रकारची धीरगंभीर शांतता पसरली. व्यापारी मंडळी ज्या कोप-यात बसली होती, तेथील एक अत्यंत सन्मान्य व्यापारी शामजीभाई हे उठले आणि त्यांनी तो पुडीचा लिलाव स्वीकारला. सभेमध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पोलिस इन्स्पेक्टरांनी पुढे होऊन शामजीभाईंना अटक केली. हे सर्व इतक्या शिस्तीने चालले होते, की यापुढे आणखी काय होणार, म्हणून लोक वाट पाहत होते. व्यासपीठावरच्या गृहस्थांनी आपल्या खिशातली दुसरी पुडी काढली आणि पुन्हा पुकारले,
''ही दुसरी पुडी कोण घेणार ? ''

सगळीकडे एकदम स्तब्धता निर्माण झाली. पुडी घेतल्यानंतर अटक होते, हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते.

एक-दोन मिनिटे निःशब्द शांततेत गेली. आता पुढे कोणी येणार नाहीत, अशी लोकांची समजूत झाली. आणि तेवढ्यातच आमचे हरिभाऊ लाड आपल्या छापखान्याच्या बाजूला बसले होते. तेथून ते उभे राहिले आणि त्यांनी
''ही पुडी मी घेतो आहे !'' असे सांगितले.

हरिभाऊंनी त्या दिवशी फक्त मला सांगून ठेवले होते, की -

''मी यात भाग घेणार आहे. तुम्ही कोणी यात पडता कामा नये. पाठीमागचे काम पुढे चालू ठेवले पाहिजे.''

त्यामुळे त्यांच्या पुढे जाऊन बेकायदेशीर मीठ खरेदी करण्याच्या धाडसाचे मला आश्चर्य वाटले नाही.

सर्व सभा स्तंभित झाली. मी पूर्वी सांगितले, त्याप्रमाणे हरिभाऊ एक बटु मूर्ती होती. शरीरामध्ये व्यंग होते. ते लंगडत चालत. तोंडात दात नसत. त्यांचे वागणे, बोलणे मोठे खणखणीत होते. त्यावेळी ते आमच्या ग्रूपचे खरे लीडरच होते. आणि मित्रही होते. मला त्यांच्याबद्दल तेव्हाही आदर होता आणि आजही आहे.

इन्स्पेक्टरांनी हरिभाऊंनाही अटक केली आणि श्री. निकम यांनाही पकडले. मग मात्र सभेमध्ये गोंधळ झाला. लोक उभे राहिले. आणि त्यांनी हरिभाऊ, शामजीभाई आणि श्री. निकम यांच्या भोवताली कडे केले. आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी धावत जाऊन लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आपल्या मोटारीतून त्या तिघांना मामलेदार कचेरीत नेले.

एक - दोन दिवसांतच त्यांच्यावर खटले चालले. आणि कायदेभंगाच्या चळवळीच्या शिस्तीप्रमाणे गैरकायदा मीठ जाणूनबुजून खरेदी केले, असे या दोघांनीही कबूल केल्यामुळे मॅजिस्ट्रेटने त्यांना काही महिन्यांची सजा दिली.