कृष्णाकांठ२९

आमच्या गावी होणा-या या नाटकांमध्ये वर निर्देश केलेल्या दोन गटांखेरीज सुशिक्षित मंडळींचा आणखी एक गट होता. त्यांनी बसविलेले श्री. औंधकर लिखित 'बेबंदशाही' नाटक मी पाहिले. बळवंतराव जाधव म्हणून आमच्या गावात एक प्रतिष्ठित व्यक्ती होऊन गेली. त्यांना नाटके बसविण्याचा फार शौक होता. ते या बाबतीत नेहमी पुढाकार घेत, हे मला माहीत होते. त्यांनी हे नाटक लागोपाठ दोन-तीन वेळा केले. तिन्ही वेळा हे नाटक पाहायला मी गेलो. सहस्रबुद्धे मास्तर संभाजीचे काम करीत आणि बाबूराव गोखले कलुशा कब्जीचे काम करीत. कुठल्याही धंदेवाईक  नटापेक्षा उत्तम अशी या दोघांची कामे होत. इतकी वर्षे झाली, तरी मला या नाटकांचे प्रयोग पाहिल्याची व जेथे ही झाली, त्या थिएटरची आठवण आहे.

नाटक कंपनीची नाटके मी मोठ्या हौसेने पाहत असे. 'आनंदविलास नाटक मंडळी' ही आमच्या कराडला वर्ष, दीड वर्षाने भेट देत असे. मास्टर दीनानाथ मंगेशकर व रघुवीर सावकार या प्रसिद्ध नटांच्या नाटक कंपन्यांची नाटकेही कराडला होत. पिटातल्या स्वस्त तिकिटांच्या जागेत बसून मी ती सगळी नाटके मनमुराद पाहिली आहेत. रात्री नऊ-साडेनऊला नाटक सुरू व्हायचे, ते पहाटे तीन-चार वाजेपर्यंत चालू राहायचे. 'मृच्छकटिक'नाटक तर यापेक्षा अधिक वेळ चाले. त्यातली संगीताची मैफल तर फारच रंगत असे.

नाटक पाहता पाहता नाटकात काम करावे, अशी इच्छा मला झाली. आमच्या शाळेच्या संमेलनातील 'माईसाहेब' या नाटकात किर्लोस्करवाडीला एका प्रयोगात मी काम केल्याचे आठवते. आमच्या नाटकांचे सूत्र-संचालन श्री. बाबूराव गोखले यांनी केले होते.

मला याच्यापेक्षा दुसरी चांगली नाटके पाहावीत, अशी इच्छा असे, पण योग येत नसे. बालगंधर्व, केशवराव दाते या नामवंत नटांची नावे नुसती ऐकत होतो. पण प्रयत्न करूनही त्यांची कामे पाहायला मिळत नसत. केशवराव दाते यांच्या महाराष्ट्र नाटक कंपनीचे नाटक कोल्हापूरला आहे, असे समजले. आणि त्यांच्या 'प्रेमसंन्यास' नाटकाची जाहिरात 'नवा काळ' मध्ये मी पाहिली आणि मनाने ध्यास घेतला, की हे नाटक पाहिले पाहिजे. गावात माधवराव घाटगे नावाचे माझे एक मित्र होते. ते नुकतेच ट्रेन्ड शिक्षक म्हणून नोकरीला लागले होते. त्यांची नेमणूक कराडलाच झाली होती. माझ्यापेक्षा ते वयाने थोडे मोठे होते; पण आमची मैत्री जुळली होती. माझ्यावर प्रेम करणारे हे गृहस्थ होते. मी माधवरावांना म्हटले,

''केशवराव दाते यांचे काम पाहण्यासाठी कोल्हापूरला जायचे काय?''

नुकताच त्यांचा शाळेच्या नोकरीचा पगार झाला होता आणि त्यांच्या खिशात पैसे होते. ते मला म्हणाले,

''जरूर जाऊ या. परंतु कोल्हापूरमध्ये राहणार कुठे? माझी कुणाशी तेथे ओळख नाही.''

मी म्हटले,

''नको कोणाची ओळख. दुपारच्या मोटर सर्व्हिसने कराडहून निघून संध्याकाळी कोल्हापूरला जायचे. कुठे तरी हॉटेलात चहा-फराळ करून नाटक पाहून झाले, की थेट स्टेशनवर येऊन रात्रीच्या गाडीने कराडला परत येऊ.''