श्री. आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांना माझा विचार पटला. बराच वेळ चाललेली ही बैठक संपली. तीत झालेल्या धारदार चर्चेनंतर आम्ही एकमेकांचा प्रेमाने निरोप घेतला आणि एकमेकाला नमस्कार करून बाहेर पडलो. श्री. कोतवालांशी हस्तांदोलन केले. त्यावेळी मला हे माहीत नव्हते, की थोड्याच आठवड्यांत हे वीर मृत्यूला कवटाळणार आहेत. श्री. कोतवालांची आणि माझी ही पहिली आणि शेवटची भेट. माहीमची ही बैठक माझ्या लक्षात राहिली आहे, त्याचे कारण श्री. कोतवालांची भेट आणि पिके जाळण्याच्या चळवळीसंबंधीची चर्चा या दोन गोष्टी आहेत. बैठक संपल्यानंतर परत जाताना ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने जावे, असा संकेत होता. त्याप्रमाणे मी माझा सगळा प्रवास बसने करून क्रॉफर्ड मार्केटच्या चौकात उतरलो आणि माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. कामगारवर्गामध्ये या चळवळीला जो पाठिंबा होता, तो पाहून मला अतिशय आश्चर्य वाटले आणि आनंदही वाटला. आणि माझ्या असे लक्षांत आले, की सातारा जिल्ह्यातल्या भूमिगत चळवळीचे अर्ध्यापेक्षा जास्त काम मुंबईतूनच चालते. फक्त मीच त्यात उशिरा सामील झालो होतो. विशेषत:, कुंडल गटाच्या कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांना, नाना पाटलांना, किसन वीरांना आणि मला मानणा-या लोकांची मोठी संख्या मी कामगार-वर्गात पाहिली.
मुंबईतला माझा मुक्काम संपवून मी मोठ्या प्रयत्नाने परत सातारा जिल्ह्यात पोहोचलो. येताना जितक्या सहज पद्धतीने मी आलो होतो, तितके जाताना सोपे नव्हते. या खेपेला सातारला परत गेल्यानंतर मी ठरविले, की एकदा सातारा जिल्ह्यातील दक्षिण भागात जाऊन आले पाहिजे आणि तेथली परिस्थिती पाहिली पाहिजे. माझी आणि श्री. के. डी. पाटील यांची बरेच दिवसांत गाठभेट नव्हती, म्हणून मी कराडला आल्यानंतर एका रात्री मोटार-सायकलच्या पाठीमागे बसून शिराळ्याला गेलो. तेथून चिखलीला गेलो. तेथे श्री. आनंदराव नाईक यांच्या मळ्यामध्ये दोन दिवस राहिलो व तेथून मधल्या वाटेने श्री. के. डीं. ना आधी निरोप पाठवून कामेरीला पोहोचलो. श्री. के. डी. पाटलांना मी मुंबईत झालेल्या माझ्या चर्चेची सर्व हकीकत सांगितली आणि देशात आंदोलन किती प्रखर होत चालले आहे, याची त्यांना माहिती दिली. त्यांना फार आनंद झाला. वाळवे तालुक्यात भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळे गट झाले होते. मला त्याची चिंता वाटली आणि मी श्री. के. डी. पाटील यांना तसे बोलूनही दाखविले. तालुक्यातील वारणाकाठचा हा भाग मोठा गुंतागुंतीचा होता. यामध्ये गुन्हेगार प्रवृत्तीचे फरारी लोक हे बरेच दिवस आधीपासून संघटित होते आणि त्यांनी आपली काही शक्ती जमवून ठेवली होती. त्यांच्या बाबतीत काय करावे, हा भूमिगत चळवळीतील आमच्या कार्यकर्त्यांपुढे खरा प्रश्न होता. माझे मत जेव्हा मला विचारले, तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितले,
''सुरुवातीला त्यांच्याशी सहकार्य करणे जरी सोयीचे वाटले, तरी आपल्या चळवळीच्या शुद्धतेच्या दृष्टीने त्यांच्यापासून अलिप्त राहणे हे अतिशय योग्य आहे.''
त्यातून कोणी शंका काढली, की यामुळे त्यांच्याशी संघर्ष करावा लागला, तर काय करायचे?
''जरूर पडली, तर संघर्ष करावा, पण शक्य असेल, तर टाळावा. कारण हे सर्व आपल्या शक्तीवर अवलंबून आहे. आपली शक्ती सरकार आणि या टोळ्या या दोन्हींविरुद्ध लढण्याइतकी प्रखर असली, तर जरूर संघर्ष अंगावर घ्यावा.''
अशा तऱ्हेची चर्चा झाली. या चर्चा श्री. के. डी. पाटील आणि चंद्रोजी पाटील यांच्याशीही झाल्या होत्या. अर्थात या चर्चा अलग अलग झाल्या होत्या. कराडच्या बाजूला युद्धप्रयत्नांच्या विरोधी कशा तऱ्हेचे काम चालू आहे आणि श्री. माधवराव जाधवांच्या नेतृत्वाखालील सेना या बाबतीत किती उत्तम तऱ्हेने काम करीत आहे, याची मी त्यांना कल्पना दिली. श्री. केशवराव नेहमीसारखे आत्मविश्वासी असलेले दिसले. त्यांनी आपल्या भोवती भूमिगत कार्यकर्त्यांचा एक संच उभा केला होता व ते सर्व क्रियाशील होते, असे दिसले. माझ्या दोन दिवसांच्या मुक्कामात नंतर कामेरीचा हा भाग सोडून जावे, असे माझ्या मनाने घेतले आणि एका कोवळ्या चांदण्या रात्री केशवरावांनी दिलेली सायकल घेऊन, डोक्याला फेटा बांधून, मी सरळ पुणे-बंगलोर रस्त्याने कराडला परतलो. मी एकटाच होतो, त्यामुळे मला कोणी अडविले नाही, किंवा वाटेत कोणी शंका पण घेतली नाही. कराडमध्ये एकदम कोठे जावे, असा प्रश्न मनामध्ये होता. आधी निरोप पाठवू शकलो नव्हतो. काही अधिक विचार न करता सरळ मी माझ्या घरी गेलो. मला पाहून घरची सर्व मंडळी आश्चर्यचकितच झाली. त्यांना काळजी वाटत होती, की मी असा घरी राहिलो, तर सापडलो जाईन. मी त्यांना सांगितले, की मी, माझा निरोप पाठविण्याची व्यवस्था करून आणि घरचे जेवण घेऊन, तेथून निघून जाईन. मला पाहून आईला फार आनंद वाटला. माझे दोन्ही बंधू घरीच होते. त्यांना चिंता वाटत होती. परंतु माझ्या भेटीचा आनंद मी त्यांच्या डोळ्यांत पाहिला.