कृष्णाकांठ१६०

१९४३ च्या जानेवारीतले माझे दिवस असे चालले होते.

१५ जानेवारीला मला कराडहून निरोप आला, की १४ जानेवारीला-म्हणजे संक्रांतीच्या दिवशीच कराड पोलिसांनी माझी पत्नी सौ. वेणूबाई हिला अटक करून कराड जेलमध्ये ठेवले आहे. पोलीस येथपर्यंत जातील, अशी माझी अपेक्षा नव्हती आणि त्यातल्या त्यात तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीच्या दिवशी माझ्या गैरहजेरीत तिला या प्रकारे जेलमध्ये जावे लागले, याचे काही मला फारसे बरे वाटले नाही. मला चिंता होती, की याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर आणि मन:स्थितीवर कसा होईल? आमच्या घराला चळवळीचा अनुभव होता, किंवा नाही म्हटले, तरी नाद होता, असे म्हटले, तरी चालेल. परंतु ती ज्या घरातून आमच्या घरी आली होती, ते घर आमच्यापेक्षा अधिक सुस्थितीत होते. तिचे वडील नुकतेच वारले होते; पण ते बडोदा महाराजांच्या खाजगीत काम करणारे त्यांच्या विश्वासातले गृहस्थ होते. तेव्हा त्यांचे राहणीमान आणि जीवनपद्धतीचा विचार करता लग्नानंतर इतक्या लवकर तुरुंग पाहायला लागणे ही गोष्ट फारच अनोखी आणि मानसिक यातना देणारी होती, असे काहीसे विचार माझ्या मनात येऊन गेले. पण मी मला समजावले, की प्रत्यक्ष जिवाचे बलिदान करण्याचे काम लोक या चळवळीत करतात, तर ही एवढीशी किरकोळ गोष्ट मी माझ्या मनावरती तिचे फारसे ओझे ठेवू न देता बाजूला केली.

सौ. वेणूबाईंना पोलिसांनी जवळ जवळ सहा आठवडे कराड आणि इस्लामपूर येथील जेलमध्ये ठेवले होते.

चळवळ संपल्यानंतर मी जेव्हा तिला विचारले,

''तुला पोलिसांनी कशी वागणूक दिली?''

तेव्हा तिने सांगितले,

''पोलीस जशी वागणूक देतात, तशीच दिली.''

विशेषत:, ते जेव्हा चौकशीचे प्रश्न विचारत असत, तेव्हा प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये उद्धटपणा होता, असेही तिने सांगितले. पण त्यामुळे जो काही थोडा-फार त्रास तिला झाला असेल, तेवढाच.

भूमिगत चळवळीचा आघात अशा पद्धतीने आमच्या कुटुंबावर हळूहळू पडू लागला. श्री. गणपतराव विजापूरला जेलमध्ये होते. सौ. वेणूबाई कराड किंवा इस्लामपूर जेलमध्ये होती आणि मी असा कुठे तरी भ्रमंती करीत भटकत हिंडत आहे, याचे काहीसे शल्य माझ्या मनाला लागून राहिले होते.

याच्यातून पुढे दोन महिन्यांनी एक दुसरी मोठी आपत्ती आमच्या कुटुंबावर आली. माझे थोरले बंधू श्री. ज्ञानदेव यांचा माझ्यापेक्षा माझे मधले बंधू श्री. गणपतराव यांच्याशी फार जिव्हाळ्याचा संबंध होता. माझ्या आणि त्यांच्या वयांत अंतर होते आणि त्यांचे आणि माझे साहचर्यही तसे फारसे झाले नव्हते. परंतु श्री. गणपतराव यांच्यावरती त्यांचे फार प्रेम होते. मी यापूर्वी जेलमध्ये गेलो किंवा आता इतके महिने भूमिगत राहिलो, त्यामुळे ते फारसे काळजीत पडले नाहीत, पण श्री. गणपतरावांना पकडल्यापासून त्यांचा जीव वा-यावर उडाला. ते घरी सांगत,

''यशवंता तर लढाईत उतरला आहे. त्याला जे काय करावयाचे, ते सरकारने करावे, पण श्री. गणपतरावांनी त्यांचे काय केले आहे? त्याला सोडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.''

त्यांना कोणी सल्ला दिला,

''तुम्ही आजारी असल्याचे डॉक्टरचे सर्टिफिकेट देऊन अर्ज केला, तर कदाचित श्री. गणपतरावांना सोडून देतील.''