कृष्णाकांठ१५९

मी त्यांना परत पाठवून दिले. सुदैवाने त्यावेळी त्या डब्यामध्ये माझ्याखेरीज दुसरे कोणी नव्हते. गाडीने सुटण्याचा आवाज दिला आणि ती सावकाश सुरू झाली. तेव्हा कुणी तरी झटदिशी दुस-या वर्गाच्या डब्याच्या पायरीवर उडी टाकून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी काहीशा चिंतेने आणि काहीशा जिज्ञासेने काय होत आहे, याची वाट पाहू लागलो. दार उघडून एक हेड-कॉन्स्टेबल आत आला. मी समजलो, की माझ्या भूमिगत जीवनाची समाप्ती आता होणार. तो आत आला आणि त्याने मला विचारले,

''तुम्ही कुठे जाणार आहात?''

मी म्हटले,
''पुण्याला. काय काम आहे तुमचे?''

तो चौकशी करू लागला, की मजजवळ तिकीट आहे, की नाही.

मी त्याला सांगितले,

''तिकीट काढण्यासाठी माणसाला पाठविले, पण तिकीट मिळाले नाही. आता पुढच्या स्टेशनवर उतरून, गार्डला सांगून, तिकिटाचे पैसे भरणार.''
तेव्हा तो पडल्या आवाजात म्हणाला,

''गार्डला कशाकरता पैसे देता? मी तुम्हांला निवांतपणे पुण्याला पोहोचवितो.''

तेव्हा माझ्या लक्षात आले, हा काही मला अटक करायला आलेला नाही, तर याला पैसे हवे आहेत. गार्डने पैसे खायचे, की हेड-कॉन्स्टेबलने पैसे खायचे, एवढाच प्रश्न होता. मला पुण्याला सुखरूप पोहोचायचे होते. त्यामुळे मी त्याला सांगितले,

''माझी काही हरकत नाही. माझ्या तिकिटाचे पैसे मी तुम्हांला जरूर देईन. परंतु गार्डची काळजी तुम्ही घेतली पाहिजे.''
- आणि त्याने सांगितले,

''तुम्ही निवांत झोपून जा. तुमची सर्व काळजी मी घेतो.''

- आणि अखेर घडलेही तसेच. रात्रभर मी निवांतपणे झोपलो. पुन्हा कोणी माझी चौकशी करावयाला आले नाही. पुणे स्टेशनच्या अलीकडे, घोरपडी स्टेशनवर हेड-कॉन्स्टेबलसाहेब माझ्यापाशी आले आणि म्हणाले,
''आता तुम्ही येथेच उतरा.''

त्याने माझे रात्रभर रक्षण केले असल्यामुळे मी त्याचा आभारी होतो. मी त्याच्या हातावर तिकिटाचे पैसे ठेवले आणि त्याने केलेला एक सलाम घेऊन मी घोरपडी स्टेशनवर उतरलो.

शेवटी पुण्यात तर पोहोचलो. यापुढचे माझे बरेच आठवडे पुण्यातच गेले. सातारा जिल्ह्याशी मी दर आठवड्याला संपर्क ठेवत होतो. पत्राने, निरोपाने चाललेल्या कामाची माहिती मिळत होती. दर आठवड्याला श्री. शांताराम बापू मला भेटत होते. त्यामुळे जिल्ह्याच्या चळवळीशी माझा तसा संपर्क राहिला होता. परंतु कार्यक्षेत्रापासून दूर गेल्यानंतर जो एकाकीपणा वाटतो, तो मला जरूर वाटू लागला. मी पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधता येतो का, हे पाहण्याचा प्रयत्न करीत होतो. पुण्यातील मुक्कामात मी वेगवेगळ्या ठिकाणी न राहता एकाच ठिकाणी बरेच दिवस राहिलो आणि ते घर माझे मित्र श्री. बबनराव गोसावी यांचे होते. दारूवाला पुलाच्या शेजारी ऐन रस्त्यावर हे घर होते. त्यांच्या घराच्या माडीचा पुढचा भाग त्यांनी माझ्या ताब्यात देऊन ठेवला होता. दिवसभर मी त्या घरात असे आणि रात्री चळवळीतील मित्रांना भेटण्यासाठी म्हणून बाहेर पडत असे. श्री. शांताराम बापूनी दिलेल्या माहितीच्या आधारे श्री. सदाशिवराव पेंढारकर हे पुण्यात आहेत, असे समजले. मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना एक वेळ भेटून त्यांच्याशी तास दोन तास गप्पा मारल्या. शिरवडे स्टेशनच्या विध्वंसानंतर श्री. सदाशिवराव पेंढारकर यांचा पोलिसांनी फार पाठलाग चालविला होता. तेव्हापासून ते सातारा जिल्ह्याच्या बाहेर होते. श्री. कासेगावकर वैद्य आणि त्यांचा एकमेकांशी संपर्क होता. मधल्या काळातील झालेल्या घडामोडींची हकीकत आम्ही एकमेकांना सांगितली आणि आम्ही निरोप घेतला. सदाशिवराव पेंढारकर हे मोठे उमेदीचे तरुण होते आणि या भेटीच्या वेळी तर मला ते फारच खुशीत दिसले. या चळवळीत काही तरी महत्त्वाचे काम आपण केले आहे, याचे त्यांना समाधान होते आणि त्यांना परिणामाची फारशी पर्वाही नव्हती.