कृष्णाकांठ१५३

ज्या दिवशी शिरवडे रेल्वे स्टेशन जाळण्याचा कार्यक्रम झाला, त्या रात्री आम्ही असेच बराच वेळ बोलत बसलो होतो, तेव्हा आम्हांला बातमी समजली, की शिरवडे स्टेशन जाळले. व्यंकटरावांनी मला जेव्हा बातमी म्हणून ही गोष्ट सांगितली, तेव्हा मी हसलो. तेव्हा त्यांना समजले, की मला ही गोष्ट अगोदरच माहीत होती.

मी त्यांना तपशील मिळवण्याकरता सूचना केली. कुणी जखमी झाले आहे काय? किंवा कोणी पकडले गेले आहे काय? याची चौकशी करा, असे  सांगितले. त्यांनी थोड्या वेळात बातमी दिली, की असे काहीही झाले नाही. त्यानंतर आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलो आणि मी शेवटी झोपी गेलो. पहाटेच्या सुमारास एका कार्यकर्त्याने येऊन सांगितले, की एक बंदुकधारी कार्यकर्ता आला आहे आणि तो तुम्हांला भेटू इच्छितो. मला अशा कुणा माणसाची कल्पना नव्हती. तरी मी विचारले, की यात काही दगाफटका नाही ना? त्यावर त्या कार्यकर्त्याने सांगितले, की तसे दिसत नाही. मी त्या स्थानिक कार्यकर्त्याला सांगितले, की त्या गृहस्थाला मजकडे घेऊन ये. ते गृहस्थ म्हणजे कुंडलचे श्री. रामूमामा पवार हे होते. शिरवडे स्टेशनवर हल्ला करणाऱ्यांपैकी ते एक होते. पोलिसांच्या बंदुका काढून घेऊन वेगवेगळ्या दिशेने जे कार्यकर्ते गेले, त्यांत रामभाऊ हे शिरवड्याच्या समोर असलेल्या डोंगरावर चढून प्रवास करू लागले. रात्रीच्या वेळी रस्ता चुकले आणि योगायोगाने ओगलेवाडीत आले. रामूमामांना मी जवळ घेतले. पोलिसांची काढून आणलेली बंदुक त्यांच्याजळ होती. ती आम्ही दुस-या एका खोलीत ठेवून दिली आणि शिरवडे स्टेशनच्या बाबतीत एकंदर प्रकार कसा काय झाला, त्याची हकीकत मी त्यांना विचारली. त्यांनी मुलांच्या बहादुरीचे वर्णन करून सांगितले. मला त्याचा अभिमान वाटला. श्री. शांताराम बापूंना बोलावून मी त्यांची सर्व व्यवस्था करवली आणि ती बंदूक घेऊन त्यांनी कुंडलला कसे परत जायचे, त्याची योजना करा, असे ठरले आणि ते प्रकरण संपले.

शिरवडे स्टेशनच्या या घटनेनंतर कराड तालुक्यात पोलिसांनी धुमाकूळ घातला. रोज रात्री कुठे ना कुठे तरी आम्हां लोकांना पकडण्याकरता ते धाडी घालत असत. आणि त्यात अयशस्वी झाल्यामुळे चिडून लोकांचा छळ करीत असत. स्वाभाविकच त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या रक्षणाची काळजी वाढली होती. अडचण होती, ती ही, की आम्हां वडीलधा-या लोकांची जी तरुण मुले होती, ती लोकांच्यांत मिळून मिसळून अशी जात असत, की त्यांना स्पर्श करणेसुद्धा पोलिसांना शक्य होत नसे. भूमिगत संघटना ही लोकजीवनावरती आधारित होऊन समरस झालेली असली, म्हणजे तिचा पाडाव करणे इतके शासन-यंत्रणेला शक्य होत नाही, याचा अनुभव आम्हांला या काळात आला.

माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला, की कुठे तरी दूर जाऊन यावे. कारण माझ्या रक्षणाची त्यांना आता अधिक चिंता वाटत होती आणि जबाबदारीही होती. आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी मला मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले होते. ते स्वीकारावयाचे, असे ठरवून मुंबईला जाण्याच्या माझ्या योजना मी आखल्या. पोलिसांच्या जाळ्यातून इतका लांबचा प्रवास करणे तसे सोपे नव्हते. पण मी एका माझ्या धनिक मित्राच्या- श्री. नीळकंठराव कल्याणी यांच्या सुंदरशा गाडीतून निवांत प्रवास करून नोव्हेंबरचा दुसरा किंवा तिसरा आठवडा असेल मुंबईत पोहोचलो.