मुंबईत पाहोचल्यावर श्री. आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी निरोप देण्याच्या ज्या खाणा-खुणा दिल्या होत्या, त्यांचा उपयोग करून मी मुंबईत आलो असल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पाहोचविली. मुंबईत तसे सुरक्षित राहणे मला साता-यापेक्षा सोपे होते. मुंबईचा आमच्या जिल्ह्यातील कामगार-वर्ग हा मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेला आहे. एक संध्याकाळ एका विभागात, तर दुसरी संध्याकाळ दुस-या विभागात, अशी आमची राहण्याची व्यवस्था आम्ही करून घेतली. श्री. शांताराम बापू हे माझ्याबरोबर मुंबईला आले होते. त्यामुळे माझी बरीचशी सोय झाली होती. कारण ते माझ्या गाठीभेटीच्या आणि इतर सर्व गोष्टींची व्यवस्था करीत होते. चार दिवसांनंतर मुंबईत असलेल्या प्रमुख पुढाऱ्यांच्या भेटीला सुरुवात झाली. भूमिगत अवस्थेतील माझा मुंबईतील हा पहिला मुक्काम होता. तशी मुंबईची मला थोडी-फार माहिती झालेली होती. सातारा जिल्ह्यातल्या कामगारांपैकी ज्यांचा या भूमिगत चळवळीशी संबंध होता, असे बरेचसे कार्यकर्ते तिथे होते. सातारा जिल्ह्यातील इतर गटांचे प्रतिनिधीही मुंबईमध्ये येऊन पोहोचले होते आणि त्यांचेही वेगवेगळ्या विभागांत संबंध होते. त्यामुळे त्यांतल्या काही प्रमुखांच्या गाठीभेटी मुंबईमध्ये झाल्या, परंतु प्रमुख पुढाऱ्यांची भेट होण्याचा जो हेतू होता, तो सफल होईल, असे काही दिसेना. विशेषत:, जिल्ह्यातील माझा अनुभव सांगून काही नवीन कार्यक्रम उभा करण्याची शक्यता आहे का, या संबंधाने मी विचारविनिमय करू इच्छित होतो आणि त्यासाठी शक्य असेल, तर श्री. अच्युतराव पटवर्धनांना भेटावे, असे माझ्या मनात होते. परंतु भूमिगत यंत्रणेतले मुंबईतील काम साहजिकपणेच इतके गुंतागुंतीचे करून ठेवले होते, की श्री. अच्युतराव पटवर्धन भेटणे शक्य नाही, असे मला सांगण्यात आले.
श्री. एस्. एम्. जोशींना मी एक वेळ भेटलो. त्यांना भेटून मला आनंद झाला. मी त्यांना सातारा जिल्ह्यातील कामाची माहिती सांगितली. ते तेव्हा मुसलमान म्हणून वावरत होते. बोहरी मुसलमानाला शोभेल, अशी दाढी, टोपी, विजार, लांब कोट अशा वेषात ते मला भेटले होते, असे मला स्मरते. त्यांच्याकडून मला असे कळले, की श्री. गोरे, श्री. साने गुरुजी अधूनमधून मुंबईत येत असतात. त्यांना तुम्हांला भेटावयाचे असल्यास मी व्यवस्था करेन, परंतु मी काही तसा आग्रह धरला नाही.
एके दिवशी एका संध्याकाळी एका रेस्टॉरंटमध्ये डॉक्टर राम मनोहर लोहियांची व माझी गाठ श्री. आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या मध्यस्थीने पडली. डॉक्टर राम मनोहर लोहियांना मी त्यापूर्वी पुणे येथे जाहीर सभेत एक भाषण करताना ऐकले होते आणि पाहिले होते. पण प्रत्यक्ष भेटण्याचा योग काही आलेला नव्हता.
डॉक्टर लोहिया इतके मोकळे गृहस्थ होते, की त्यांनी आपल्या वेषातही फारसा बदल केलेला नव्हता. रेस्टॉरंटमधील कोप-यातील एका टेबलाजवळ बसून हलक्या आवाजात ते सर्व देशातील परिस्थितीची हकीकत मला सांगू लागले. पूर्व यू. पी. आणि बिहार येथे झालेल्या चळवळीचा वृत्तांत त्यांनी मला सांगितला. सर्व देशभर क्रांतीचे उधाण कसे वाढते आहे, याचे उत्साहजनक चित्र त्यांनी माझ्या डोळ्यांपुढे उभे केले. मीही त्यांना सातारा जिल्ह्यातील माझे चळवळीचे अनुभव सांगितले.
मी त्यांना स्पष्ट केले, की मी एका मर्यादित क्षेत्रात काम करतो आहे. परंतु जनतेची मुळे जेथे असतात, अशा ठिकाणी मी काम करीत असल्यामुळे माझ्या अनुभवाला काही एक वेगळा जिवंत अर्थ आहे. मोर्च्याची चळवळ, त्यात झालेले अत्याचार व नंतर आता युद्धप्रयत्नाला विरोध करण्याकरता चालू असलेले कार्यक्रम याची माहिती मी त्यांना दिली. मोर्च्याचा कार्यक्रम त्यांना ऐकून माहिती होता. ते म्हणाले,
''मनुष्यहानी झाली, ही गोष्ट खरी आहे आणि ती टाळण्याचा तुमचा निर्णयही बरोबर आहे. पण जनआंदोलन वाढवण्याकरता पहिले पाऊल म्हणून काही त्याग धैर्याने करावा लागतो. तुफान वादळामध्ये जशी नौका टाकून द्यावयाची असते, तसाच काहीसा प्रयत्न एका जबरदस्त लष्करी शक्तीशी लढताना करावा लागतो आणि म्हणून क्रांतीच्या चळवळीत काही बलिदान अपरिहार्य असते. झालेल्या मनुष्यहानीबद्दल तुम्हांला दु:ख होणे स्वाभाविक आहे. पण त्याने मन मोडून घेऊ नका. या चळवळीच्या निमित्ताने समाजातील जे गरीब, दलित व मागासलेले वर्ग आहेत, त्यांच्यापर्यंत जा. त्यांच्यातील कार्यकर्ते उभे करा.''