या चर्चेच्या आधारावर मी माझ्याशी संबंधित असणारे विखुरलेले जे कार्यकर्ते होते, त्यांना पत्रव्यवहाराने हे सर्व विचार कळविले. मी या कार्यक्रमाची रूपरेषा देणारे एक पत्र तासगावचे डॉक्टर यशवंत सोहनी यांनाही लिहिले होते. डॉ. यशवंत सोहनी हे अत्यंत निर्भय आणि साधे कार्यकर्ते होते. ते भूमिगत होते. पण त्यांनी भूमिगतपणाचे कसलेच बहाणे केले नव्हते. ते उघड उघड रेल्वेने प्रवास करीत होते. आपला नित्याचा पोशाख त्यांनी कायम ठेवला होता. त्यामुळे माझे पत्र त्यांच्या हाती गेल्यानंतर रेल्वेच्या एका प्रवासात पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांच्या खिशात असलेले माझे पत्र हे त्यावेळी पोलिसांनी जप्त करून नेले. कच्च्या कैदेतून डॉ. यशवंत सोहनींनी हा निरोप माझ्याकडे पाठवून दिला. भूमिगत चळवळीच्या कामात असे कधी तरी होणे शक्य असते, तसे ते झाले होते. मी त्यासंबंधी काही फारशी काळजी केली नाही.
ते पत्र मला अजून काही पुन्हा पाहता आलेले नाही. पण या १९४२ सालच्या आंदोलनाचे संशोधन करणारे काही संशोधक यांनी ते पत्र पाहिले आहे, असे त्यांनी मला सांगितले आहे. त्या पत्रामध्ये रेठ-याच्या बैठकीमधील झालेल्या चर्चेचा सारांश होता, असे म्हटले, तरी चालेल. वैयक्तिक हत्या आणि सार्वजनिक मालमत्ता, जिचा युद्धप्रयत्नांशी संबंध नाही, अशांचा नाश करू नये, असा एक विचार मी त्या पत्रात व्यक्त केला होता. आमची चळवळ विचारत:, कार्यक्रमाच्या दृष्टीने काय रूप घेत होती, याची काहीशी कल्पना यामुळे येऊ शकते.
भूमिगत चळवळीची ही दुसरी अवस्था निर्माण झाल्यामुळे तिच्याशी सुसंगत अशी आमची संघटना उभी करण्याचे काम आम्हांला अधिक काळजीपूर्वक करावे लागले. क्रांतिवीर नाना पाटील यांची या बाबतीतील ही संघटना अतिशय चोख आणि जबरदस्त होती. त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांना निरोप पाठवून भेटणे किंवा काही निरोप पाठविणे सोपे होते. पण प्रत्यक्ष नाना पाटलांना भेटणे कधीच सोपे गेले नाही. माझ्या भूमिगत जीवनाच्या काळात त्यांना भेटून त्यांच्याशी विचारविनिमय करावा, अशी माझी फार इच्छा हाती, परंतु ते मला कधीच करता आले नाही. त्यांच्या पाठीमागे पोलिसांचा जो ससेमिरा होता, या दृष्टीने ते काळजी घेत होते, ते युक्तच असले पाहिजे, असा विचार करून हा विषय मी तेथेच सोडला.
दुस-या प्रमुख कार्यकर्त्यांची अधूनमधून भेट होत असे. त्यांची संघटना आणि कार्यकर्त्यांचे गट हे वेगळे होते. तरी त्यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष विचारविनिमय घडण्याची शक्यता होती. कराडमध्ये मी माझ्याभोवती जी संघटना उभी केली होती, तीमध्ये व्यक्तिश: माझेही एकलेपण मला फार जाणवत होते. कारण आता सरकारने मला पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा पाठीमागे होता. त्यामुळे मी चार-दोन माणसांपेक्षा जास्त लोकांच्या संबंधात येण्याचे टाळू लागलो. माझ्याशी नित्य संबंधांत होते, ते म्हणजे श्री. शांताराम बापू इनामदार. माझे सर्व प्रवास, ठिकठिकाणी राहण्याच्या जागा हे ठरविणे, ज्यांना कुणाला मला भेटावयाचे असेल, त्यांची माझी गाठ घालून देणे, ही सर्व कामे मी त्यांच्यावर सोपविली होती. चळवळीला आर्थिकदृष्ट्या मदतीची थोडी-फार गरज होती. परंतु ती आम्ही स्थानिक प्रयत्नांतून पुष्कळदा उभी करण्याचा प्रयत्न केला.
देशभक्तीची भावना असणारी, परंतु प्रत्यक्ष कार्य करू न शकणारी अशी कित्येक कुटुंबे होती. ती या चळवळीला आर्थिक मदत नित्यनियमाने देत असत. परंतु आमच्या गटाला उघड मदत करणारे, त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या धनिकांपैकी श्री. व्यंकटराव ओगले हे एकच गृहस्थ होते. केंद्रीय संघटनेशी संबंध प्रस्थापित करण्याचा आम्ही थोडा-फार प्रयत्न केला आणि त्यात काहीसे यशही आले, आणि तेही अगदी योगायोगाने. त्या केंद्रीय संघटनेशी संबंधित असणारे त्यांचे क्रियाशील असे कार्यकर्ते श्री. आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे हे होते. श्री. आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे हे महाराष्ट्रातील विख्यात विधायक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी भूमिगत संघटनेला महाराष्ट्रात फार मोठे सहकार्य केले, यात शंका नाही. ते महिना, दोन महिन्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांत जात असत. तसे ते एकदा सातारा जिल्ह्यात आले असता त्यांची आणि माझी दोन वेळा भेट झाली. मी केव्हा तरी मुंबईला येऊन केंद्रीय स्तरावर काम करणा-या नेत्यांना भेटावे, असे त्यांनी सुचविले. मी त्यांना नोव्हेंबरमध्ये येईन, असे कबूल केले. त्यांनी आमच्या गटाला आर्थिक साहाय्य देण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा मी त्यांना सुचविले, की आमच्या गटासाठी जर काही मदत करायची असेल, तर ती श्री. व्यंकटराव ओगले यांच्याकडे पोहोचती होईल, अशी व्यवस्था करा, म्हणजे आम्हांला ती नियमितपणे मिळत जाईल. त्यांनी तशी थोडी-फार व्यवस्था केली आणि तिचा आम्हांला उपयोगही झाला.