कृष्णाकांठ१६१

- आणि ही कल्पना त्यांच्या मनात खोल जाऊन बसली. कराडमध्ये महिना, दोन महिन्यांनी छोटी ऑपरेशन्स् करण्यासाठी बाहेरून डॉक्टर येत असत आणि एकाच दिवशी पाच-पंचवीस ऑपरेशन्स् करून जात असत. आमच्या कराडचे ज्येष्ठ डॉक्टर दातार अशा ऑपरेशन्स्ची व्यवस्था कराडमध्ये करीत असत.

आमच्या दादांच्या पाठीला एक लहानसे आवाळू होते, ते हळूहळू वाढत होते. तेव्हा त्यांच्या मनाने घेतले, की या आवाळूचे ऑपरेशन करून घ्यावे आणि त्याचे सर्टिफिकेट देऊन सरकारकडे अर्ज करावा, म्हणजे श्री. गणपतराव सुटून येतील. हा सगळा त्यांच्या मनाचाच खेळ होता. त्यांनी कुणाही जाणत्या माणसाशी सल्लामसलत केली नाही. ऑपरेशन करण्याचा त्यांचा विचार त्यांनी फक्त आईला आणि आपल्या पत्नीला सांगितला. त्या दोघींनाही तो पसंत नव्हता. त्यांचे म्हणणे होते, आपल्या घरातील कोणी कर्ते माणूस जवळ नसताना तुम्ही हे करू नये. पण त्यांच्या मनात भावाच्या सुटकेसाठी हे सारे करावयाचे आहे, असे होते. त्यामुळे त्यांनी कोणाचे ऐकले नाही. ऑपरेशनच्या दिवशी ते डॉक्टरकडे गेले आणि मला ऑपरेशन करावयाचे आहे, असे सांगू लागले. मुलगा ऑपरेशन करतोच आहे, म्हणून माझी आई ऑपरेशनच्या वेळी जाऊन बसली. या ऑपरेशनसंबंधाने तिचे मन फार शंकित होते. पण मोठा मुलगा ऐकत नाही, मग करणार काय, अशा आपत्तीत ती होती. खरे म्हणजे डॉक्टरांनी विचार करायला पाहिजे होता. अशा तऱ्हेचे ऑपरेशन, ऑपरेशन नंतरची काळजी घेण्याची साधने आणि व्यवस्था नसताना करावे का, याचा निर्णय त्यांनी त्यांच्या शास्त्राप्रमाणे करावयाला पाहिजे होता. पण त्यांनी तो केला नाही आणि त्यांनी दादांचे ऑपरेशन केले. ऑपरेशननंतर अर्धा-पाऊण तास तेथे ठेवून घेतले आणि नंतर टांग्यात बसवून घरी पाठवून दिले. या मोठ्या जखमेची काळजी घरात कोण घेणार होते? डॉक्टरने सांगितलेल्या गोळ्या आणि पुड्या देण्याचे काम माझी आई करत बसली. इतर लोकांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. कारण दादांची प्रकृती ऑपरेशननंतर बिघडू लागली. जखम सेप्टिक झाली आणि त्यात त्यांना न्यूमोनियाचा ताप भरला. दादा त्या जखमेशी आठ-दहा दिवस झगडत राहिले व शेवटी त्यातच त्यांचा अंत झाला.

ही सारी हकीकत त्यांच्या मृत्यूनंतर जवळ जवळ पंधरा दिवसांनी मला पुणे येथे समजली. मधल्या काळात परस्परांशी संबंध ठेवणे इतके सोपे राहिले नव्हते. पुण्याला जेथे मी राहत होतो, तेथे एके दिवशी रात्री शांताराम बापू आले आणि त्यांनी मला तुम्हांला एक वाईट बातमी सांगायची आहे, म्हणून सांगितले व दादांच्या मृत्यूची सर्व हकीकत सांगितली. मला फार दु:ख झाले. आमच्या दादांनी आईच्या बरोबरीने आमच्या लहानपणापासून आमचे पालन-पोषण केले. त्यांचा असा करूण अंत व्हावा, आम्ही दोन्ही भाऊ जवळ नसताना व्हावा, आणि त्यांच्या मृत्यूची बातमी दोन आठवड्यांनी मला कळावी, याचे मला अतिशय वाईट वाटले.

दादांच्या मृत्यूने आमच्या कुटुंबावरील संकटाचा एका अर्थाने कळस झाला होता. माझ्या डोळ्यांपुढे माझ्या आईची दु:खी, करुण मूर्ती उभी राहायची आणि मी अस्वस्थ होऊन जायचो. शांताराम बापूंच्या बरोबर मी निरोप पाठविला, की मी एक वेळ आईला भेटावयास येईन. पण शांताराम बापू आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी त्याला पूर्ण विरोध केला आणि आईला भेटण्याचा माझा विचार सोडून देऊन मला पुण्यातच राहावे लागले.

या काळात सातारा जिल्ह्यात भूमिगत चळवळ ही स्पष्टपणे गनिमी काव्याची सशस्त्र चळवळ होण्याच्या मार्गाला लागली होती आणि याच चळवळीला पुढे 'पत्री सरकार' असे नाव मिळाले. काही कार्यकर्त्यांनी हत्यारे जमविली होती आणि सरकारबरोबर आणि सरकारधार्जिण्या समाजकंटकांशी लढणे हेही एक आपले महत्त्वाचे काम आहे, असा त्यांचा निर्णय झाला होता. त्यामुळे ते आपल्या भागामध्ये त्या दृष्टीने क्रियाशील झाले होते. मी समजलो, की मला ज्या पद्धतीने चळवळ चालवावयाची होती, तिच्यात काही फरक पडतो आहे. पण तो फरक हा परिस्थितीमुळे अपरिहार्य आहे, याचीही मला जाणीव झाली. जिल्ह्यामध्ये जाऊन सर्व कार्यकर्त्यांशी पुन्हा बोलावे, अशी परिस्थिती नव्हती.