विविधांगी व्यक्तिमत्व-५२

विशेष म्हणजे नगरपालिकेने आपल्या ग्रंथालयामार्फत हे विचार ग्रंथबद्ध करून या विचारांच्या प्रसाराची महाराष्ट्रभर सोय केली आहे व भावी पिढयांचीही सोय करून ठेवली आहे. हे सारे काम तसे जिकीरीचे. पण हे सारे प्रचंड उत्साहाने केले जाते. येथील कार्यकर्त्यांकडून व्रत समजून वाण घेतल्यासारखे आणि तेही कोणताही गाजावाजा किंवा डामडौल न करता.

या सर्व गतिमानतेच्या पाठीमागचे कुशल, सव्यसाची रसिक नेतृत्व म्हणजे कर्‍हाडचे लोकप्रिय नगराध्यक्ष पी. डी. पाटील. साधारण कोठल्याही नगरपालिकेची परिस्थिती पाहिली तर एखाद्या व्यक्तीला तीन तपाच्यावर नगराध्यक्षपदाचा मान अखंडपणे व दीर्घकाळ मिळणे दुर्मिळ! यावरून कर्‍हाडवासी जनतेचा त्यांच्यावर किती लोभ आहे ते कळते. लोकप्रियतेची ती पावतीच होय! समाजमनाची मशागत करणारा कोणताही विषय आणि समाजाची बांधिलकी मानणारा कोणताही वक्ता असला म्हणजे झाले.

या व्याख्यानमालेद्वारा १९७३ पासून आजपर्यंत व्याख्यान, व्याख्याते, समाजप्रबोधन असा त्रिवेणीसंगम या प्रीतिसंगमावर साकारला आहे. गेल्या २८-२९ वर्षांत या व्याख्यानमालेत महाराष्टातील अनेक नामवंत वक्त्यांनी मोलाचे विचार मांडले. त्याचे संकलन 'राजकारण आणि समाजकारण' यांच्या एकात्मतेच्या ध्येय-तार्‍यांच्या प्रकाशात आपल्या जीवनप्रवासाचा मार्ग आपल्याला आखता येईल, ‘असा आशावाद येथेच प्राचार्य देवदत्त दाभोळकर यांनी व्यक्त केला.’ 'व्यक्तीच्या विकासावर समाजवादाचे भवितव्य अवलंबून आहे,' हे भाकीत प्राचार्य मंगुडकरांनी वर्तविले, ते येथेच. 'स्वातंत्र्योत्तर काळात निवडणुकांच्या राजकारणात जातीय भावनेला खतपाणीच मिळाले' ही खंत प्रा. गं. बा. सरदारांनी इथेच बोलून दाखविली आणि 'भारतीय लोकांजवळ सुज्ञपणा, समजूतदारपणा, संयम, योग्य विचार व चांगल्या गोष्टींचा निवाडा करण्याची क्षमता आहे; म्हणून भारतीय लोकशाहीचे भवितव्य उज्ज्वल आहे' हा आशावाद प्रा. ए. एम. खान यांनी इथेच व्यक्त केला. 'ज्या लोकशाहीत लोकांचे प्रश्न सोडविले जात नाहीत, ती लोकशाही टिकत नाही' हेही इथेच सांगितले. माजी न्यायमूर्ती वि. अ. नाईक यांनी. 'अविकसित देशांतील समाजवादाच्या स्वरूपाची' श्री. सदाशिव बागाईतकरांनी चर्चा केली ती याच व्याख्यानमालेत आणि आर्थिक परिस्थितीतून - आर्थिक परिस्थितीच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचविला गेला तोही याच व्याख्यानमालेत प्राचार्य भणगे यांनी 'ज्या समाजात गतिमानता नव्हती ते समाज लयाला गेले', हे ऐतिहासिक सत्य श्री. टी. के. टोपे यांनी इथल्याच व्यासपीठावर सांगितले. 'तरूण पिढी कोणत्या संस्काराने आणि विचाराने प्रभावीत होते, यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे', असा मूलगामी विचार याच व्यासपीठावर बोलून दाखविला डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी. 'मूल्यांची आलटापालट म्हणजे सुधारणा नव्हे' हे प्राचार्य गोपाळराव मयेकरांनी ऐकविले ते याच व्याख्यानमालेत. इथेच धनंजय कीर यांनी शाहू छत्रपतीच्या समाजक्रांतीचे अचूक मूल्यमापन केले आणि इथेच डॉ. भालचंद्र फडके यांनी सुजाणांना डॉ. आंबेडकरांच्या प्रकाशाचे गीत गायला सांगितले. 'महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचा इतिहास' आमदार पी. बी. साळुंखे यांनी इथेच बोलका केला.  'समाजपरिवर्तनासाठी सामान्य माणसाला शिक्षित करणं आणि उभं करणं जरूर आहे.' हे सत्य प्राचार्य सत्यरंजन साठे यांनी कथन केले तेही याच व्यासपीठावरून. 'सबंध देशच आज विद्वेषाच्या आगीत सापडला आहे

महाराष्ट्रातही ती आग भडकलेली आहे. ती विझविण्यासाठी पाणी आणावे लागेल, महात्मा फुल्यांच्या हौदातून राजर्षि शाहूंच्या पंचगंगेतून, आंबेडकरांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या महाडच्या चवदार तळ्यातून आणि या तीनही ठिकाणांहून आणलेल्या पाण्यात सोडावी लागेल सानेगुरूजींनी आयुष्यभर ढाळलेल्या अश्रूंची धार! असे 'हे' पाणी 'ही' आग विझवू शकेल', ही चिकित्सा डॉ. जनार्दन वाघमारे यांनी 'महाराष्ट्राचे कालचे, आजचे व उद्याचे राजकारण व समाजकारण' या विषयावर इथेच केली. 'शेतीच्या अर्थशास्त्राचा व दुग्धव्यवसायातील समस्यांचा' श्री. प्रतापराव भोसले यांनी इथेच खल केला. 'सत्य हाच संस्कृतीचा गाभा आहे. संस्कृती समृद्धितून वाढते व स्थिरावते, आध्यात्मिक संस्कृतीचा 'विठोबा' भैक्तिक संस्कृतीच्या भाकरीवर उभा आहे'. हा बहुमोल विचार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याकरवी इथेच कथन केला. 'एकजिनसी समाजनिर्मितीसाठी नवीन कल्पना असलेल्या नव्या महाराष्ट्र धर्माची व्याख्या' श्री. नानासाहेब गोरे यांनी प्रतिपादन केली ती इथेच. 'कार्ल मार्क्स - जीवन, विचार आणि समाजशास्त्र' या विषयावर सखोल विवेचन केले श्री. वसंत पळशीकर यांनी याच व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर. 'यशवंतराव जन्मभर उपासक व प्रवक्ते राहिले ते काँग्रेस संस्कृतीचे. ज्या संस्कृतीत प्रचंड ध्येयवाद होता. काँग्रेसने सोपविलेली मुख्यमंत्रीपदाची धुरा १९५६ ते १९६२ या कालखंडात त्यांनी सांभाळली.