विविधांगी व्यक्तिमत्व-५०

वैचारिक व्यासपीठाचा श्रीगणेशा

यशवंतराव चव्हाण वैचारिक व्यासपीठाचा श्रीगणेशा होण्यात जे कारण घडले ते मोठे गमतीदार होते. १९७१-७२ साल असावे. व्याख्यानाच्या निमित्ताने मा. विठ्ठलराव गाडगीळ कर्‍हाडला आले होते. तसेच प्राचार्य डॉ. मा. प. मंगुडकर हेही अन्य व्याख्यानाच्या निमित्ताने कर्‍हाडला आले होते. योगायोगाने कर्‍हाडचे नगराध्यक्ष मा. पी. डी. पाटील व कर्‍हाडच्या सार्वजनिक जीवनात रस घेणारे सार्वजनिक काका शंकरराव करंबेळकर यांची गाठ पडली. त्या भेटीत सहज बोलता बोलता महाराष्ट्राला वैचारिक विचाराचे पाथेय देणारा यशवंतरावासारखा महापुरूष सुदैवाने लाभलेला असताना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक स्वतंत्र वैचारिक व्याख्यानमाला आयोजित करून समाज जागरणाचे काम का करू नये असे चौघांनाही वाटले. त्या सर्वांचे एकमत झाले आणि त्याची कार्यवाही जलदगतीने करण्यासाठी मला मा. पी. डी. साहेब यांनी सांगितले. त्या चर्चेतच पहिल्या वर्षीच्या व्याख्यानमालेत प्राचार्य देवदत्त दाभोळकर, प्राचार्य डॉ. मा. प. मंगुडकर आणि प्रा. गं. बा. सरदार या नामवंत विचारवंतांची व्याख्याने निश्चित करण्यात यावीत असे ठरले.

विचार करणारा व विचार बोलून दाखविणारा प्राणी ही माणसाची व्याख्या, त्याचे विचार इतर प्राण्याहून असणारे वेगळेपण सिद्ध करते. मानवी जीवन विकसित करण्यासाठी, समाज गतिमान करण्याची क्षमता विचारात आहे, म्हणूनच विचाराचे, नव्या विचाराचे स्वागत झाले पाहिजे. विचारातून विचार जन्माला येतात. 'अभिप्राओ. अभिप्रायाते विये। भावांचा फुल्लोरा होतू जाये॥ मतिवरी।' म्हणजे तरी वेगळे काय? कलह झाला पाहिजे तो विचारांचा. विचाराचे धन घेऊन समाजाचे मन समृद्ध करण्याची आवश्यकता ओळखणारी कर्‍हाडची नगरपालिका ही महाराष्ट्रात कदाचित एकमेव असावी. रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण यांची व्यवस्था केली की संपली जबाबदारी. पण कर्‍हाड नगरपालिकेने तसे मानले नाही. नागरिकांच्या निकोप मानसिक आरोग्याचीही तिने काळजी वाहिली. कर्‍हाड नगरीला ललामभूत ठरणारे समृद्ध वाचनालय आणि नवनवीन विचारांनी नागरिकांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध बनविणारी कर्‍हाडची 'यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला' या दोन्ही गोष्टी कर्‍हाडकरांच्या अभिमानाचा विषय आहेत.

मा. यशवंतरावजी चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरू केली ती नगराध्यक्ष श्री. पी. डी. पाटील यांनी आणि तिला पाठिंबा दिला त्यांच्या सहकार्‍यांनी. यात पी. डी. पाटील यांची योजकता व समयसूचकता सिद्ध होते.

कारण विचारावर जिवापाड प्रेम करणार्‍या विचारवंतांची जीवनचरित्रे नेहमीच प्रेरक व मार्गदर्शक असतात. अखिल विश्वाविरुद्धही झगडण्याची क्षमता असलेल्या या विचारवंताच्या विचारवैभवाने आपण दिगमूढ होतो. विवेकनिष्ठेचा आग्रह धरणारांची आपल्या देशातील परंपरा ज्या थोडया लोकांनी जतन केली आहे, त्यात यशवंतरावजी अग्रणी आहेत. लोकशाही ही एक केवळ राजकीय प्रणाली नसून ती सर्वव्यापी अशी संकल्पना आहे. ती जीवननिष्ठा झाली पाहिजे, पण भारतीय जातिव्यवस्था आणि लोकशाही यातील आंतरिक विसंगती नष्ट करणे हे त्यांनी आपले एक महत्त्वाचे उद्दिष्ट मानले आहे. तेच ध्येय या व्याख्यानमालेच्या आयोजनामागेही आहे.