पं. भीमसेन जोशी हे एका आठवणीत म्हणतात की, 'यशवंतराव चव्हाण मोठे रसिक व उमदे व्यक्तिमत्त्व, मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी माझं गाणं ऐकलं होतं, परंतु प्रत्यक्ष परिचय नव्हता. ओगलेवाडीचे व्यंकटराव (पापा) ओगले, कर्हाडचे तमण्णा विंगकर हे मित्र ओगलेवाडीला येत. त्यात यशवंतराव असायचे., परंतु आम्हाला ते नंतर माहीत झाले. गाण्याचे ते शौकिन होते. गायन ऐकता येईल एवढया अंतरावर थांबूनच ते गाण्याचा आस्वाद घेत असत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा माझा परिचय झाला तो त्यांनीच आयोजित केलेल्या एका मैफलीमुळे. संगीतात रस घेणारे असल्यामुळे सूरसिंगार या संस्थेशी त्यांचा निकटचा संबंध होता. १९६१ साली खाँ बडे गुलाम अली टयूमरने आजारी होते. त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. यशवंतराव कलेचे आणि कलावंताचे चाहते होते. त्यांनी ही गोष्ट मनावर घेतली आणि संगीताच्या मैफलीचा कार्यक्रम आयोजित केला. सितादेवी यांचे कथ्थक नृत्य व पं. निखिल बॅनर्जी यांचे सतारवादन आणि पं. भीमसेन जोशी यांचे गायन. रंगभवनमध्ये हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या उत्पन्नातून चाळीस हजाराची रक्कम खाँ बडे गुलाम अली यांना वैद्यकीय उपचारासाठी उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाच्या वेळी यशवंतरावांनी पं. भीमसेनना तंबोर्याची भेट दिली. ती भेट त्यांनी आजअखेर जपून ठेवली आहे. कलावंतांना यशवंतरावांचं असं सहकार्य असायचं. त्याचा कधी बभ्रा केला नाही.
महाराष्ट्र असेंब्ली अधिवेशनाला जोडूनच नागपूर येथे महाराष्ट्र राज्याने सुरू केलेला संगीत महोत्सव आयोजित केला होता. सूरश्री केसरबाई यांना आणि मला बोलाविले होते. केसरबाईंना कार्यक्रमाच्या ठिकाणी यायला वेळ लागला. मी वेळेवर पोहोचलो., परंतु कामाच्या गडबडीत यशवंतरावांच्याकडून निरोप आला की, 'मी येईपर्यंत कार्यक्रम सुरू नका'. त्यांना फार तर अर्धा तास उशीर झाला. ते पोहोचताच मी कार्यक्रम सुरू केला. श्रोत्यापैकी काही मंडळी कोंडाळे करून अस्ताव्यस्त आडवे-तिडवे पसरले होते, मला ती गोष्ट खटकली. म्हणून मी माईकवरून श्रोतृवृंदांना, 'संगीत ही कला आहे. कसे बसायचे, याच्या काही पद्धती आहेत. त्याचे या ठिकाणी पालन झाले पाहिजे' असे सांगितले. हे ऐकताच यशवंतराव ताडकन उठले आणि त्यांनी श्रोत्यांना खडसावलं ''मैफलीची म्हणून काही एक शिस्त असते. ती पाळता येत नसेल तर घरी जा आणि झोपा, आडवं पसरण्याची जागा घर आहे, मैफलीचं सभागृह नव्हे.'' त्यांनी स्वत:च असं खडसावल्यामुळे सारे सावरून बसले. माझं गाणं संपत आलं तेव्हा यशवंतरावांनी एक भजन म्हणण्याची फर्माइश केली. हे हिन्दी भजन त्यांच्या आवडीचं होतं. भैरवी रागातलं ते भजन मी गायलो., परंतु त्यामुळे केसरबाईंना घुस्सा आला. बैठक संपवून मी बाहेर येताच केसरबाई रागाने म्हणाल्या, 'भैरवीशिवाय दुसर्या रागात भजन येत नाही का?”
मला एकच राग, एकच भजन येतं असं सांगून मी दूर झालो. यशवंतरावांना हेच हिन्दी भजन आवडतं हे त्यांना सांगण्यात काही अर्थ नव्हता.
यशवंतरावांच्या ठिकाणी जे कलाप्रेम होतं, रसिकता होती, तेवढं प्रेम रसिकता मला अन्य राजकारणी मंडळीत क्वचितच आढळली. त्यांची एक शिस्त होती, संपूर्ण मैफल ऐकण्याइतका वेळ असेल तरच ते मैफलीच्या ठिकाणी यायचे. गाणं ऐकायचे तर ते पूर्ण हा त्यांचा शिरस्ता ठरला होता. मैफल अर्धवट सोडून ते कधी उठायचे नाहीत. बडे गुलाम अली खाँसाहेब, हिराबाई बडोदेकर, जोत्स्ना भोळे यांच्यासारख्या सुप्रसिद्ध कलाकारांच्या गायनाच्या मैफली त्यांनी अनेकदा ऐकल्या.
यशवंतरावांच्या कला व साहित्यप्रेमाची साक्ष देणार्या त्यांच्या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सुधीर फडके व कवी ग. दि. माडगूळकर यांच्या त्यांनी सांगितलेल्या आठवणी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत.
'तुमच्या पुष्कळ रेकॉर्डस् माझ्याकडे आहेत. मी त्या अनेक वेळा ऐकतो, पण ज्यावेळी अतिशय गंभीर किंवा चिंतेत असतो त्यावेळी तुम्ही गायलेले ''डोळयामधले आसू पुसती ओठावरले गाणे'' ही रेकॉर्ड लावतो आणि ते ऐकून मला विरंगुळा मिळतो असे ते म्हणाले. त्यावर मी चटकन म्हटलं, ''यशवंतराव, हे गाणं वारंवार ऐकावं लागत असेल.''
यशवंतराव दिलखुलास हसले. कलावंत व साहित्यिक हे यशवंतरावांचे जिव्हाळयाचे विषय होते. त्यांच्या सुख-दु:खाकडे जसे त्यांचे लक्ष असे, तसे त्यांच्यातील वादंग, भांडणे याकडेही असे. याचा अनेकदा प्रत्यय आलेला आहे. फडके - माडगूळकर यांची भांडणे असंख्य वेळा झाली. पुन्हा ते एकमेकांशी बोलूही लागले व एकत्र काम करू लागले. शेवटचं भांडण बरीच वर्षे टिकले.