विविधांगी व्यक्तिमत्व-५३

दिल्ली दरबारातील डावपेचांमध्ये ते जरी उणे पडले असले, तरी त्याच दरबारातील अतिशय महत्त्वाची पदे त्यांनी अतिशय प्रभावीपणे व यशस्वी रीतीने सांभाळली. कारण ते विविध रंगी, सर्वस्पर्शी महान व्यक्तिमत्त्व होते, हे स्पष्ट केले रॉयवादी विचारवंत व एक ज्येष्ठ पत्रकार श्री. द्वा. भ. कर्णिक यांनी याच व्याख्यानमालेत. 'ज्यांना माणूस केंद्रीभूत मानून समाज आणि राष्ट्रउभारणीचा विचार करावयाचा असतो, त्यांना म्हणूनच, जनतेला आपल्या वास्तव परिस्थितीची जाणीव करून द्यावी लागते,' हे डॉ. रावसाहेब कसबे यांनी 'धर्म आणि इतिहास लेखन' या दोन व्याख्यानांतून इथेच खुलासेवार सांगितले. 'नेतृत्वात वारंवार बदल होत गेल्यामुळे गेल्या काही वर्षात महाराष्ट्राची शेती, सिंचन, उद्योगधंदे, मनुष्यबळनिर्मिती आणि विज्ञान तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात कशी परागती होत आहे, याचे विदारक चित्रण 'महाराष्ट्र दिशाहीन होतो आहे काय?' या विषयावरील व्याख्यानाद्वारे श्री. रायभान जाधव यांनी याच व्याख्यानमालेत केले. प्रा. बा. ह. कल्याणकर यांनी याच व्यासपीठावरून 'महात्मा फुले : सामाजिक विचार आणि आजचे सामाजिक संदर्भ' या विषयावर दोन प्रभावी व्याख्यानांतून आपले सुस्पष्ट परखड विचार कर्‍हाडकरांना ऐकविले. 'यशवंतरावांची विकास कल्पना ही कुठल्या प्रबंधातून किंवा पुस्तकातून आलेली नसून, ती त्यांच्या जीवनक्रमाच्या अनुभूतीतून आलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश यशवंतरावांनीच आणला आणि मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून समाजवादाचा पाळणा     'महाराष्ट्राच्या थोर नेत्याचे (कै. चव्हाणांचे) जर खर्‍या अर्थाने स्मरण ठेवायचे असेल तर त्यांची राष्ट्रभक्ती, लोकशाही समाजरचना व धर्मनिरपेक्षता या मूल्यांची जिवंत जाग आपण यापुढेही ठेवली पाहिजे.' प्राचार्य डॉ. राम जोशी यांच्या व्याख्यानाच्या निमित्ताने हा विचार पुढे जागविला आहे. केवढे मौल्यवान विचार मांडले आहेत या विचारवंतांनी!

निरनिराळया ठिकाणांहून मोठमोठे विचारवंत नगरपालिकेच्या आमंत्रणानुसार कराड येथे येतात. आपले विचार प्रस्तुत करतात. नगरपालिकाही त्या विचारांचे संवर्धन करण्यासाठी पैसा खर्च करून पुस्तकरूपाने ते विचार जतन करते. कारण ज्यांना प्रत्यक्ष येऊन हे विचार ऐकावयाची संधी मिळत नाही, त्यांच्यासाठी या पुस्तकांचा विनियोग व्हावा ही त्यामागील सदभावना आहे. अशा पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी सन १९७९चे पुस्तक शिवाजी विद्यापीठाने व सन १९८०चे पुस्तक मुंबई विद्यापीठाने एम. ए. ला अधिक वाचनासाठी नियुक्त केले होते. यावरून आस्थेवाईक अभ्यासकांना हा उपक्रम किती उपयुक्त ठरत आहे याची प्रचीती येते. लोकसंवादासाठी नगरपालिका जो हा वागयज्ञ उभारते त्याला आजच्या घडीला म्हणावा तेवढा प्रतिसाद श्रोतृवृंदाकडून लाभत नाही, ही बाब मात्र विचार करण्यासारखी वाटते.

विद्येची नगरी असलेल्या येथील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, सर्वसामान्य नागरिक यांच्याशी अत्यंत आपुलकीचे नाते नगरपालिकेच्या या वाचनालयाने निर्माण केले, हे या व्याख्यानमालेचे फलित होय. सुसंस्कृत नागरपणाचा डौल, ग्रामीण मनमुक्त धीटाई असणारे कर्‍हाडचे व्यक्तिमत्त्व म्हणूनच लोभस ठरते. शहराच्या साफसफाईबरोबरच नागरिकांच्या मनाची, विचारांची साफसफाई नगरपालिका या ग्रंथालयाद्वारे व यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेद्वारे करत आहे. आजच्या कठीण काळातही अशा व्याख्यानमाला होणे गरजेचे आहे, हे या संस्थांनी ओळखले आहे. म्हणूनच त्यांचे अभिनंदन!