विविधांगी व्यक्तिमत्व-५४

अभिजात रसिक प्रतिभावंत

साहित्याच्या क्षेत्रात माझी भूमिका नम्र रसिक वाचकाची आहे हे यशवंतरावांनी आवर्जून वारंवार सांगितले असले, तरी तेवढयापुरती ती मुळीच सीमित नव्हती. त्यांचा मूळ पिंडच प्रतिभावंताचा होता.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर यशवंतराव राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्याचवेळी राजकारणी, मुत्सद्दी या गुणाबरोबरच साहित्यिक यशवंतराव असा त्यांचा बोलबाला झाला. राजकारणात वावरणारा जो खरा मुत्सद्दी असतो तो अगदी मोजक्या शब्दात आपले मनोगत व्यक्त करतो. साहित्य लेखनातही यशवंतरावांचा हाच गुण प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस येतो. समर्थ साहित्यिक असेल तरच तो आपले मोठे मनोगत थोडया शब्दात व्यक्त करू शकतो. त्यांचे लेखन आटोपशीर असायचे. सह्याद्रिचे वारे, शिवनेरीच्या नौबती, युगांतर, ॠणानुबंध, भूमिका, वुईंडस् ऑफ चेंज, कृष्णाकांठ हे त्यांचे ग्रंथ वाचताना त्याची प्रचीती येते. 'केसरी' दिवाळी अंका (१९६२) मध्ये त्यांचा सर्वस्वी सत्यावर आधारलेला 'नियतीचा हात' हा लेख ललित साहित्याचा उत्कृष्ट नमुना मानावा लागेल. हा जेवढा भावपूर्ण लेख आहे तेवढाच आपल्या आईवर लिहिलेला 'सोनहिरा' हा भावमधुर लेख आहे.

यशवंतरावांना मुळातच साहित्याची आवड होती. त्यांचं स्वत:चं वाचन चोख होतं. स्वत:चं ग्रंथालय समृद्ध होतं. मराठीबरोबरच हिंदी आणि इंग्रजीतील उत्तमोत्तम ग्रंथ त्यांच्या संग्रही होते. नोबेल पुरस्कार, अन्य पुरस्कार लाभलेले ग्रंथ ते आवर्जून आणीत - वाचीत. कोणीही मोठा ग्रंथकार, विद्वान, लेखक, कवी किंवा कलाकार राजधानीत आला तर त्याला साहेबांकडे आग्रहाचं निमंत्रण असे. ते या सर्वांशी मौलिक विचारविमर्श करीत.

श्री. राम खांडेकर आपल्या आठवणीत सांगतात, 'साहेब रोज १२ ते १५ तास काम केल्यानंतर रात्री जेवणानंतर तास - दीड तास वाचन केल्याशिवाय झोपत नसत. दिवसाही सवड मिळाल्यास अधून-मधून वाचन चालू असे. वाचनाची शैली मात्र वेगळी. एकाच वेळी ५-६ पुस्तके हाती घ्यायचे. प्रत्येकातील काही पात्रे वाचायची. प्रवासात वाचण्याची पुस्तके-मासिके निराळी असायची. दिल्लीला आल्यानंतर जबाबदारीप्रमाणे पुस्तकांचे विषयही अनेक होत गेले. पुस्तकांची निवड बारकाईने करीत. पुस्तके मनन करून वाचत व वाचलेल्या पुस्तकातील मजकूर विसरत नसत. संग्रही असलेल्या पुस्तकांचे व त्या लेखकाचे नाव लक्षात रहात असे. पुस्तक वाचन चालू असताना कोणी अडथळा आणला, तर त्या गोष्टीची त्यांना फार चीड होती. एक राजकारणी, मुत्सद्दी, संसदपटू, कार्यक्षम मंत्री आणि पक्षनेते हा त्यांचा 'राजकीय' लौकिक जगभर झालेला आहे. मराठी माणसाला त्यांचा अभिमानही आहे. अन्य राजकारण धुरंधरापेक्षा यशवंतरावांचे वेगळेपण हे आहे, की त्यांचा आपल्या मराठी भाषेवर खूप जीव होता. ते स्वत: एक सर्जनशील कलावंत व उत्तम समीक्षकही होते. आयुष्यभर अखंड चौफेर वाचनामुळे वाचलेल्या ग्रंथांची आस्वादक समीक्षा करण्याचे सामर्थ्यही त्यांना लाभले होते.

कर्‍हाड येथे १९७५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षीय भाषणात ते म्हणतात-''साहित्य हे थर्मामीटरमधील पार्‍यासारखे संवेदनशील असते. समाजाच्या माणसामध्ये जे असते तेच साहित्यात अवतरते. साहित्य कोणत्याही रंगाचे असले तरी चालेल, पण आजूबाजूच्या परिस्थितीचा डोळसपणे अभ्यास करून समाजात सर्वथरांत निर्माण झालेल्या अवस्थेतील जाणीव असणारे समाजचिंतन त्यात असले पाहिजे. राजकारण व साहित्य दोघांचे माध्यम शब्द आहे. म्हणून राजकारणी हे साहित्यिकांचे शब्दबंधू असतात.''

''भारतीय, विश्वात्मकता व मराठीपणा हे तिन्ही गुण एकाच वेळी आले तरच आपले साहित्य समृद्ध होईल. त्यात भिन्न रुचित्व येईल. इंद्रधनुष्याची प्रभा त्यावर पसरेल. प्रीतिसंगमावर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आहे. आमची कृष्णाकाठची भाजी-भाकरी गोड मानून घ्यावी. भाजी - भाकरी असली तरी कसदार आहे.'' असे यशवंतराव स्वागताध्यक्षीय भाषणात सांगतात. याच दरम्यान कर्‍हाड येथे महाराष्ट्र वाङ्‌मय मंडळाची स्थापना करून प्रतिवर्षी एका उत्कृष्ट वाङ्‌मय प्रकाराला 'कर्‍हाड पुरस्कार' आता 'यशवंतराव चव्हाण कर्‍हाड पुरस्कार' प्रदान करण्याची मुहूर्तमेढ रोविली.