विविधांगी व्यक्तिमत्व-५१

विचाराने माणसे निर्भय बनतात, त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो, समस्येच्या मुळाशी जाण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची, तो बोलून दाखविण्याची, कृतीत उतरविण्याची आणि त्यातून समाज व देश यांच्या अभ्युदयासाठी झगडण्याची तळमळ लोकांमध्ये वाढावी हे या व्याख्यानमालेचे उद्दिष्ट आहे.

साहित्य, संगीत, सौंदर्य, क्रीडा, करमणूक या समाजजीवनाला समाधान देणार्‍या गोष्टी आहेत. शारदीय व्याख्यानमालेच्या निमित्ताने कर्‍हाड नगरपालिकेने या संदर्भात कर्‍हाडकरांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अभिरूची निर्माण केली आहे. त्याचबरोबर आजच्या गतिमान कालखंडात नव्या पिढीतील समाजघटकात चिकित्सक व अभ्यासूवृत्ती वाढीस लागावी, सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्यांचा, स्थित्यंतराचा परिचय व्हावा ही अत्यावश्यक बाब आहे. समाजातील विचारवंतांचे विचारधन मुक्तपणे उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. एका प्रयत्‍नवादी, अभ्यासू, यशस्वी अशा सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्वाच्या यशवंतरावजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे जनजागरणाचे, संस्काराचे, विचारधन प्रसारणाचे अनन्यसाधारण कार्य नगरपालिकेने आजपर्यंत कर्‍हाडच्या जीवनात ध्येयाने प्रेरित होऊन उभारले आहे.

या व्याख्यानमालेतील व्याख्यानातून यशवंतरावांच्या जीवनचरित्राची केवळ चर्चा होत रहावी हा प्रधान हेतू मुळीच नाही. आज भारतीय समाजाच्या, राष्ट्रीय जीवनाच्या ज्या समस्या आव्हानाचे स्वरूप घेऊन आपल्यापुढे उभ्या राहिल्या आहेत, त्या सामाजिक, आर्थिक, राजकीय समस्यांचा अभ्यासपूर्ण ऊहापोह अधिकारी व्यक्तींच्या नियोजित व्याख्यानातून व्हावा हाच प्रधान हेतू आहे.

समस्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे धैर्य नव्या पिढीने यशवंतरावांच्या सहृदयतेने, अभ्यासूवृत्तीने दाखवावे. यशवंतरावांच्या एकाग्रतेने प्रत्येक समस्येचे मनन, चिंतन करावे, यशवंतरावांच्या तर्कशुद्ध विचारपद्धतीने स्वत:चे निष्कर्ष काढावेत. यशवंतरावांच्या ध्येयनिष्ठेने व जिद्दीने हे निष्कर्ष व्यवहारात आणावेत. यशवंतरावांच्या भक्तिभावाने समाजाची नि मातृभूमीची सेवा करावी. ही उत्कट भावना या व्याख्यानमालेच्या पाठीमागे आहे. विचारवंतांच्या विचाराचे प्रसारण करणारे मुक्त व्यासपीठ म्हणून यशवंतराव चव्हाणांचे नाव या व्याख्यानमालेला देण्यात यावे, असा एकमुखी पाठिंबा व्याख्यानमाला सुरू करण्यापूर्वी नगरपालिकेच्या सभासदांनी दिला होता व ७-२-१९७३ रोजी या विचारप्रसारण कार्याला 'यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला' या नामाभिधानाने शुभारंभ झाला. असा लोकजागरणाचा वसा घेऊन आलेला त्यांचा वाढदिवस प्रत्येक कर्‍हाडकराच्या जीवनातील महत्त्वाच्या भावनेला हेलावणारा दिवस आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वरूपात दिसणारे हे नेत्रदीपक प्रज्ञाप्रचीतीचे राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्त्व कलेकलेने साकारत गेले. त्यांचा विचार नि उच्चार समाजपरिवर्तनाला उपकारक ठरेल, या भावनेने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात कर्‍हाड नगरपालिकेने निश्चित औचित्य दाखवले आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्यांचा परिचय होत राहिला, विचार, विवेक-विमर्श या विचारमंथनाच्या प्रक्रिया व्यक्तीच्या जीवनावर जर संस्कार करून गेल्या तर कोणता सामाजिक आविष्कार व्यक्त होतो, त्याचे यशवंतराव चव्हाण मूर्तिमंत उदाहरण आहे. यशवंतरावांचे जीवनचरित्र नव्या पिढीला दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणारे आहे. यशवंतराव म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक नि राजकीय चळवळीचे प्रवाह समजून देणारा खळाळून धावणारा जीवनस्त्रोत! अशा गतिमान व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनजागरणाचा उपक्रम म्हणजे ही व्याख्यानमाला होय.