यशवंतराव चव्हाण (122)

आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊली देवस्थान ट्रस्टने बांधलेल्या वसतिगृहाच्या उद्‍घाटनासाठी यशवंतरावजी आळंदीला आले होते. इंद्रायणीच्या पुलावर वारकरी मंडळी त्यांच्या स्वागतासाठी उभी होती. यशवंतरावजी मोटारीतून उतरले आणि दिंडीत सामील झाले. ते म्हणाले, ''विश्वाची माऊली झालेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी वारकारी दिंडीबरोबर दोन पावले चालून दर्शनाचा अनुभव मला घेऊ द्या !''  ''दिंडीबरोबर चालत यशवंतराव माऊलींच्या मंदिरापर्यंत गेले आणि त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेतले.

वसतिगृहाच्या उद्‍घाटनाचे त्यांचे भाषण फारच प्रभावी झाले. यशवंतराव म्हणाले, ''जेव्हां जेव्हां मी आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी आलो, तेव्हां तेव्हां मी अजानुवृक्षाखाली पांच-दहा मिनिटे डोळे झांकून बसलेलो आहे. यात मला फार समाधान वाटायचे. राजकारणातील तणावाचे ओझे कमी व्हायचे.''  मी नव्याने काय लिहित आहे असे विचारून यशवंतराव मला म्हणाले, ''माऊलींचा ओवीबद्ध ग्रंथ लिहून काढा आणि प्रकाशित करा.''  त्यावर मी म्हटले, 'पण ग्रंथ प्रकाशित कसा होणार ?  त्यासाठी अर्थसहाय्य कोण देणार ?'  यशवंतराव पटकन म्हणाले, ''निवृत्ती विजय, सोपानदेव ग्रंथ कागदावर छापण्यात आला. माऊलींचा ग्रंथ सोन्याच्या पानावर छापतील, इतकी जगाला माऊलींची ओढ आहे.''

- भास्करबुवा सातारकर

------------------


अनंतराव पाटील हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या देहू गांवचे. कॉलेजात असताना १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग. येरवडा तुरुंगात स्थानबद्ध. विद्यार्थी दशेतच पत्रकारितेत प्रवेश. 'सकाळ'चे सहसंपादक असताना यशवंतरावांचा परिचय. १९४६ नंतर निकटचा सहवास आणि त्यातून स्नेह. काँग्रेस संघटनेत सहकारी. यशवंतरावांच्या इच्छेला मान देऊन विशाल सह्याद्रि दैनिकाची स्थापना. मुख्य संपादकाची जबाबदारी स्वीकारून चोवीस वर्षे संपादकपद भूषविले.

लोकसभेवर दोनदा निवड. जगभर प्रवास. उत्तम लेखक आणि वक्ते. संत साहित्याचे गाडे अभ्यासक. संत तुकाराम, चोखा मेळा, संत मुक्ताबाई, ज्ञानोबा ते तुकोबा, महात्मा गौतम बुद्ध, यमुनेच्या तीरावरून, सत्तांतर, जनादेश आणि चौदा पुस्तकांचे लेखक. राजकारणात यशवंतरावांना सदैव साथ आणि पाठिंबा. चव्हाणांचे निष्ठावान चहाते आणि शिष्यवत् अनुयायी. लोकसभेत दहा वर्षे सावलीप्रमाणे बरोबर राहिलेला विश्वासू सहकारी. पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत आणि राजकारणात कार्यमग्न.